आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 72 Workers Are Died In Manila Factory Major Fire News In Marathi

मनिलातील कारखान्याला भीषण आग; ७२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिला- फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये रबरी चपलांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आग लागली. यात ७२ कर्मचाऱ्यांचा जळून मृत्यू झाला. अनेक जण बेपत्ता आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला. कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर पळता आले नाही. या मजल्याचे दरवाजे व ग्रील बंद होत्या.
कारखान्याचे मालक व व्यवस्थापनाविरुद्ध पोलिसांनी फौजदारी गुन्हा नोंदवला आहे. कारखान्याच्या मुख्य फाटकाचे वेल्डिंगचे काम सुरू होते, असे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने सांगितले. त्या वेळी अचानक स्फोट झाला. तेथे असलेल्या ज्वलनशील व रासायनिक पदार्थांमुळे आग जास्त भडकली. कारखान्यात २०० ते ३०० कर्मचारी काम करत असल्याचे मालक व्हीएटो आंगने सांगितले. मृतांपैकी ३९ जणांची आेळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबीयांकडून मागितली मदत : अनेक कर्मचाऱ्यांनी टेक्स्ट मेसेज पाठवून नातलगांना वाचवण्यासाठी बोलावले. मात्र, नातेवाईक कारखान्यापर्यंत येण्यापूर्वीच सगळे खाक झाले होते. मृतांच्या नातलगांनी आणि यातून सुटका करून घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी व्यवस्थापनाविरुद्ध निदर्शने केली.

कारखान्याची राखरांगोळी
केंटेक्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्प नावाच्या या कंपनीत बुधवारी आग भडकली. आग नियंत्रणात येण्यास ५ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. गुरुवारपर्यंत ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. डियोनेशियो कँडिडो यांची मुलगी, नात, सून आणि पुतणीचा यात मृत्यू झाला. व्यवस्थापनाने त्यांना राख झालेल्या इमारतीत जाण्याची परवानगी दिली. येथे मृतदेहांचा खच होता. सुटका करून घेण्यासाठी धावपळ करताना त्यांचा जीव गेला. बाहेर पडण्याचा रस्ता ग्रीलने बंद केलेला होता. या ग्रीलमधून मांजरही पळू शकत नाही.