आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

777 रुपयांची हायटेक बांगडी, गर्भवतींना 9 महिन्यांत पाठवणार 80 मेसेज, कार्बन मोनॉक्साइड जास्त झाल्यास करणार सतर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - गर्भवती महिला आता हायटेक बांगडी घालून आपल्या आरोग्याशी संबंधित संदेश मिळवू शकतील. बांगलादेशी कंपनीने बनवलेली ही बांगडी फक्त मेसेजच देणार नाही तर प्रदूषित हवेच्या धोक्याचीही माहिती देईल. तिची किंमत १२ डॉलर (सुमारे ७७७ रु.) आहे. त्यामुळे माता मृत्यु दरात घट होईल, असा कंपनीचा दावा आहे. कोल नावाची ही बांगडी आधी बांगलादेश आणि भारताच्या बाजारात येईल. त्यानंतर ती जगातील इतर देशांत लाँच केली जाईल.
 
माता मृत्युदर जास्त असलेल्या भागात भारतासह संपूर्ण आशियाचाही समावेश आहे. तेथे प्रति एक लाख मुलांच्या जन्मामागे १७५ पेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होतो. जागरूकतेची कमतरता हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे. ब्रिटनसारख्या विकसित देशांत माता मृत्यू दराचा आकडा १ लाख मुलांच्या जन्मामागे १० पेक्षा कमी आहे. ग्रामीण इंटेल सोशल बिझनेसने हे आकडे लक्षात घेऊन बांगडी बनवली आहे. त्यांनी त्याला कोल (कार्बन मोनॉक्साइड एक्सपोजर लिमिटर) नाव दिले आहे. ते एका अर्थाने स्मार्ट रिस्टवॉचप्रमाणे आहे. आपल्या नावानुरूप ही बांगडी कार्बन मोनॉक्साइड आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण अधिक झाल्यावरही महिलांना सतर्क करेल.

ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात किंवा रस्त्यावर काम करतात, त्यांना तिचा फायदा होईल. ज्या महिला शेतीत तसेच इतरही शारीरिक कष्टाची कामे करतात अशा ग्रामीण महिला लक्षात ठेवून ही बांगडी बनवण्यात आली आहे. त्यामुळे ती जलरोधक बनवली आहे. लवकर तुटत नाही अशा चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकचा वापर तीत करण्यात आला आहे. बांगडीत इन-बिल्ट बॅटरी आहे. ती १० महिने चालते. बॅटरी संपल्यास ती चार्ज केली जाऊ शकते. काही लोक मात्र ही बांगडी महाग असल्याचे म्हणत आहेत. पॉव्हर्टी अॅक्शन लॅबमध्ये काम करणारे मॅथ्यू बुनी म्हणाले की, दक्षिण आशियात वार्षिक दरडोई उत्पन्न जास्त नाही. बहुतांश शेतकरी किंवा मजूर एका दिवसात २०० ते ३०० रुपयेच कमावतात. त्यातून त्यांच्या रोजच्या गरजा मुश्किलीने पूर्ण होतात. त्यामुळे त्यांना १२ डॉलरची बांगडी खरेदी करणे सहज शक्य नाही.

बांगडीत मेसेजसह रिमांडरही
या बांगडीत गर्भारपणाशी संबंधित ८० मेसेज आहेत. ते आधीपासूनच रेकॉर्ड आहेत. दर आठवड्याला एक किंवा दोन मेसेज येतात. ते वाचले किंवा ऐकले जाऊ शकतात. या मेसेजमध्ये खाण्या-पिण्याच्या किंवा प्रकृतीशी संबंधित सामान्य माहिती असते. त्यात रिमाइंडरचीही सुविधा आहे. त्यामुळे महिला, डॉक्टरांशी भेटीची वेळ किंवा आवश्यक कामे लक्षात ठेवू शकतील.
 
बातम्या आणखी आहेत...