आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने सीमेवर वाढवली हवाईदलाची कुमक; चिनी माध्यमांचे वृत्त, संरक्षण मंत्रालयाचे मात्र मौन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनने भारताच्या सीमेलगत वायुदलाची कुमक वाढवल्याचे वृत्त चीनच्या माध्यमांनी दिले आहे. या वृत्तात गंभीर काहीच नसल्याचे चीन सरकारने म्हटले आहे. भारत-चीन सीमेवर आपण शांतता प्रयत्नांसाठीच काम करत आहोत, असे सरकारच्या सूत्रांनी सांगितले. लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी)जवळ चीनने वायुदलाची कुमक वाढवली असल्याचे वृत्त येथील अधिकृत माध्यम असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने दिले. याविषयी आपण अनभिज्ञ असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी म्हटले आहे. सीमेवर शांतता प्रस्थापित करणे हाच दोन्ही देशांचा उद्देश असून चीन त्याचे पालन करत आहे.  

 

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तावर चीनच्या संरक्षण मंत्रालयाने काहीच प्रतिसाद दिलेला नाही. भारताने नव्या युद्ध विमानांची खरेदी केली आहे. फ्रान्सकडून भारताने राफेल युद्धविमाने घेतल्यानंतर चीनला आक्रमणाची चिंता आहे. त्यामुळे हवाई कुमक वाढवल्याचे वृत्तात लिहिले आहे.  


चीनच्या लष्कराने जे-१० जेट युद्धविमानांची छायाचित्रे जारी केली होती. जे-११ या एक आसनी, ट्विन इंजिन जेट विमानांची छायाचित्रेही लष्कराने जारी केली. त्यानंतर ग्लोबल टाइम्सने हे वृत्त प्रसारित केले. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए)वेस्टर्न थिएटर कमांड क्षेत्रातील हवाई कुमक वाढवण्यात आली असल्याचे यात म्हटले आहे. चीनने या क्षेत्रात नुकतेच जे-२० हे युद्धविमानही तैनात केल्याचे वृत्त आले होते. तिबेटजवळच्या युद्ध स्थानकावर गेल्या काही महिन्यांत चीनने हवाई बळ वाढवले आहे.

बातम्या आणखी आहेत...