आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम जोंग उन यांचा ‘राजहट्ट’ पुन्हा सुरू; अमेरिकेला दणका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - अमेरिका उत्तर कोरियावर अणुकार्यक्रम संपुष्टात आणण्यासाठी सतत दबाव टाकत असून हे धोरण एकतर्फी असल्याचा आरोप उ. कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी केला आहे. हेच धोरण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे असेल तर आपण १२ जून रोजी होणारी सिंगापूर बैठक रद्द करू, अशी धमकीही किम यांनी दिली आहे. अमेरिकेकडून आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी उ. कोरिया आपला अणुकार्यक्रम सरसकट बंद करत असल्याचा गैरसमज अमेरिकेने करून घेऊ नये. आम्हाला त्या मोबदल्यात आर्थिक मदत नकोय, असेही उ. कोरियाने स्पष्ट केले.  


२४ तासांच्या आत किम यांनी घूमजाव केल्याने व्हाइट हाऊसमधूनही गोंधळात टाकणारी प्रतिक्रिया मिळाली आहे.  किम जोंग उन यांनी अणुकार्यक्रम बंदीचा मुद्दा उचलला असून त्यावर अमेरिका स्वतंत्र चर्चा करेल, असे व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी सांगितले आहे. १२ जून रोजी सिंगापूर येथे होणाऱ्या द्विपक्षीय बैठकीची तयारी अमेरिका करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत प्रामुख्याने सीमा सुरक्षा व कोरियन द्वीपकल्पातील शांतता हे महत्त्वाचे मुद्दे असतील, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.  


अमेरिकेने निर्णायक भूमिका घेऊ नये : उ. कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री ग्वान किम केई यांनी सांगितले की, दक्षिण कोरियाशी होणारी प्रस्तावित द्विपक्षीय चर्चाही आम्ही रद्द करत आहोत. अमेरिका बेपर्वाईची वक्तव्ये देत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले होते की, कोरियन द्वीपकल्पात अणुकार्यक्रम रद्द करण्याचा प्रस्ताव उ. कोरियाने मान्य केल्यानेच सिंगापूर बैठकीसाठी अमेरिका राजी झाली आहे. या बोल्टन यांच्या विधानामुळे उ. कोरियाचे धोरण फिसकटले आहे. वास्तविक उ. कोरियाला आपल्या अणुकार्यक्रमाचा खुलासा अमेरिकेसमोर करायचा नसून ते स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून आपल्याला आहे. तसेच अणुचाचणी केंद्र नष्ट करणे म्हणजे अणुकार्यक्रम सरसकट बंद असा अर्थ होत नसल्याचेही किम यांनी या वेळी सांगितले.  

 

१२ जून रोजी बैठक होणार : अमेरिका
केसीएनएच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना व्हाइट हाऊस प्रशासनाने म्हटले आहे की, अणुकार्यक्रम हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. १२ जून रोजी उभय नेत्यांची चर्चा होणार आहे. यात केवळ कोरियन द्वीपकल्पातील शांतिवार्ता होणे अपेक्षित असून सीमावाद हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यावर व्हाइट हाऊस प्रशासन काम करत आहे. या चर्चा होणार हे निश्चित असल्याचे व्हाइट हाऊस प्रवक्ता सारा सँडर्स यांनी सांगितले. दक्षिण कोरियासोबत सुरू असलेला युद्धाभ्यास ही दीर्घ रणनीती आहे. द. कोरियानेही त्यामुळे अशांतता निर्माण होते, असे म्हटलेले नाही. त्यामुळे किम जोंग यांच्याशी होणाऱ्या चर्चेचा याच्याशी संबंध नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

 

द. कोरिया- अमेरिका युद्धाभ्यासावर घेण्यात आला आक्षेप  
दक्षिण आणि उत्तर कोरियादरम्यान या आठवड्यात होणारी उच्चस्तरीय चर्चाही रद्द करण्यात आली आहे. नॉर्थ कोरिया सेंट्रल न्यूज एजन्सीच्या (केसीएनए) सूत्रांनी सांगितले की, अमेरिका व द. कोरियाच्या हवाई कवायती सुरू आहेत. त्यांचे संयुक्त युद्धाभ्यास म्हणजे उ. कोरियाला एकटे पाडण्याचा कार्यक्रम अाहे. यामुळेही दोन्ही कोरियांत अविश्वास निर्माण होत आहे. १६ मे रोजी होणारी उच्चस्तरीय चर्चा यामुळे रद्द करणे गरजेचे असल्याचे केसीएनएने म्हटले आहे. गेल्या शुक्रवारपासून द. कोरिया व अमेरिकेच्या संयुक्त हवाई कवायती सुरू आहेत. यात १०० युद्धविमाने, ८ एफ-२२ रडार, बी-५२ बॉम्बर्स आणि एफ-१५ के जेटचा समावेश आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...