आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियातील युद्धग्रस्तांच्या मदतीसाठी 30 दिवसांच्या शस्त्रसंधीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र- सिरियातील युद्धग्रस्तांची स्थिती बिकट असून तेथे तातडीने शस्त्रसंधी लागू करावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे स्वीडन आणि कुवेत यांनी केली आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रात मतदान घेण्यात यावे आणि किमान ३० दिवसांची शस्त्रसंधी लागू करावी. लाखो नागरिक येथे असहाय असून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी यामुळे सवड मिळेल असे स्वीडन व कुवेतच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.  


सुरक्षा परिषदेने येथिल इसिस, अल कायदा आणि नूरा फ्रंटच्या ठिकाण्यांवरच हल्ले करण्याची मुभा दिलेली होती. सिरिया सरकारच्या सहकार्याने आपण त्यांनाच लक्ष्य करत असल्याचे रशियाने म्हटले आहे. इदलीब प्रदेशातील स्थिती दारुण असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. दमास्कसच्या उपनगरात, पूर्व घौऊता येथील मानवाधिकाराची स्थिती वाईट आहे.  

बुधवारी पूर्व घौऊतामध्ये ३४६ जणांचा बळी 

 

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनाने म्हटले आहे की, बुधवारी पूर्व घौऊता येथे ३४६ जणांचा बळी गेला. सिरियन फौजांची येथे कारवाई सुरू आहे. ४ फेब्रुवारीपासून सिरियाच्या या क्षेत्रात तीव्र संघर्ष सुरू आहे. येथील संघर्षाची कारणे समजून घेतली पाहिजेत, असे आग्रही मत व्हॅसिली यांनी मांडले आहे. दमास्कसवरही दहशतवाद्यांचा तीव्र हल्ला सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटर्रेस यांनी म्हटले की, घौऊतामधील संघर्ष त्वरित थांबला पाहिजे. सध्या तेथे ४ लाख नागरिक नरक यातना भोगत आहेत.  

 

 

रशिया नकाराधिकार वापरण्याची शक्यता 
शस्त्रसंधीविषयी मत घेण्याच्या प्रस्तावाविरुद्ध रशियाने नकाराधिकार वापरला नाही तरच हा प्रस्ताव संमत होऊ शकेल. रशियाचे संयुक्त राष्ट्रातील दूत व्हॅसिली नेबेन्झिया यांनी म्हटले आहे की, ३० दिवसांची शस्त्रसंधी हा व्यावहारिक प्रस्ताव नव्हे. याची अंमलबजावणी करणे अशक्य आहे.  या भूमिकेचा विरोध स्वीडन व कुवेतने केला आहे.  व्हॅसिली यांनी सुरक्षा परिषदेची बैठक पूर्व घौऊता येथील स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी बोलावली आहे. रशिया शस्त्रसंधी टाळत असल्याचा आरोप आहे. 

 

रशियावर निर्बंध लादणार : अमेरिका  
वॉशिंग्टन- डोनाल्ड ट्रम्प यांचे रशियाविषयी मवाळ धोरण असल्याचे अमान्य करत रशियावर निर्बंध लादले जातील असे व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी म्हटले आहे. रशियाशी संरक्षण करार करू नये यासाठी नाटो सदस्य देशांवर अमेरिका दबाव आणत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र विरोधीप्रणाली घेणार असल्याचे तुर्कीने नुकतेच घोषित केले होते. नाटो सदस्यांवर दबाव आणण्याविषयी अमेरिकी काँग्रेसमध्ये दबाव वाढत आहे.  

 

 

सिरिया सरकार नागरिकांच्या हत्याकांडासाठी जबाबदार : मर्केल  

 

बर्लिन - जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सिरियन सरकारच्या क्रूरतेवर टीका केली आहे. तेथील निरपराध नागरिकांच्या मृत्यूस सरकार जबाबदार असल्याचे मर्केल म्हणाल्या. लहान मुले, महिलांच्या कत्तली तसेच रुग्णालयांवर हल्ले हे अमानवी अाहे, असे युरोपीय महासंघाच्या परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या. युरोपीय देशांनी यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. रशिया, बशर सरकार व इराणने कत्तली थांबवण्यासाठी प्रयत्न कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

 

बातम्या आणखी आहेत...