आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमध्ये लष्करी अकादमीवर इसिसचा हल्ला; 15 अफगाण सैनिकांचा बळी, 16 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल- इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने अफगाण लष्करी अकादमीवर केलेल्या हल्ल्यात १५ अफगाण सैनिकांचा बळी गेला. अकादमीबाहेर गस्त घालणारे सैनिक यात ठार झाले, तर १६ सैनिक जखमी आहेत. राजधानी काबूलमधला या महिन्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. सोमवारी काबूल येथील मार्शल फहीम राष्ट्रीय लष्करी अकादमीवर झालेल्या हल्ल्याची सुरुवात पहाटे ४ वाजता झाली. दिवसभरात हल्लेखोरांनी लष्करी अकादमीवर हल्ले केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  


सर्वात पहिला हल्ला आत्मघातकी बॉम्बरद्वारे करण्यात आला होता. त्यानंतर लष्करी अकादमीचे सुरक्षा कडे अधिक मजबूत करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्याचे अफगाण संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते दौलत वझिरी यांनी सांगितले. पहाटे झालेल्या हल्ल्यात ५ दहशतवादी सामील होते. पैकी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैनिकांना यश आले. दोन दहशतवादी आत्मघाती स्फोटात मरण पावले. एकाला अटक करण्यात अफगाण लष्कराला यश आल्याचे वझिरी यांनी सांगितले आहे.  


दरम्यान, लष्करी अकादमीकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. येथे केवळ रुग्णवाहिकांना परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद झाल्यानंतर सर्व परिसर लष्कराने ताब्यात घेतला आहे. आत्मघातकी बॉम्ब व्हेस्ट, एके-४७  आणि इतर स्फोटके लष्कराने ताब्यात घेतल्याचे वझिरी यांनी सांगितले. हा हल्ला लष्कराविरुद्ध होता, असेही त्यांनी सांगितले.  

 

खोरासन प्रदेशातील इसिस पथकाचे कृत्य  
हल्ल्यानंतर काही तासांनी इसिसच्या खोरासन प्रदेशातील गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. स्थानिक अमाक वृत्तसंस्थेनेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, पाकिस्तानने या हल्ल्याचा निषेध केला आहे. काबूलच्या क्वारगाह लष्करी स्थानकाजवळ ही अकादमी आहे. या अकादमीची उभारणी २०१३ मध्ये झाली होती. येथूनच अनेक अमेरिकी उच्च लष्करी अधिकारी बेपत्ता झाले होते. गेल्या वर्षीदेखील या अकादमीला आत्मघातकी बॉम्बरने लक्ष्य केले होते. यात १५ लष्करी अधिकारी ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी तालिबान्यांनी स्वीकारली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...