आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये समेट घडवू, ट्रम्प यांच्या जावयाने दिले संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम- मध्य-पूर्वेतील इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात नजीकच्या काळात मैत्रीपूर्ण संबंध दिसल्यास आश्चर्य वाटू नये. कारण उभय देशांतील शत्रुत्व दूर करून त्यांच्यात समेट घडवून आणण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार तथा जावई जेरड कुश्नेर यांनी दर्शवली आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महंमद अब्बास तयार असल्यास त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


अब्बास सोबत काम करण्यास तयार असल्यास मला काहीही अडचण नाही, असे त्यांनी सांगितले. पॅलेस्टाइनचे 'अल-कुद्दस' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कुश्नेर यांनी ही उदारवादी भूमिका मांडली आहे. उज्ज्वल भविष्याचा तुम्हालाही हक्क आहे. आता इस्रायल व पॅलेस्टाइनच्या नेत्यांनी आपापल्या नेतृत्वाला बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे. परिस्थिती सामान्य व्हायला हवी. परस्परांत भीती नको. वास्तविक कुश्नेर यांनी मध्य-पूर्वेचा एक दौरा काढला होता. आठ दिवसांच्या दौऱ्यानंतर कुश्नेर यांनी पॅलेस्टाइनशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेची दारे खुली असल्याचे म्हटले आहे. 


शिष्टमंडळाची अनेक देशांना भेट 
कुश्नेर यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या चमूने इस्रायल, जॉर्डन, कतार, इजिप्त व सौदी अरेबिया या देशांचा आठ दिवसांचा दौरा केला होता. त्यात गाझा व शांतता कराराच्या प्रस्तावाबाबतची चर्चा करण्यात आलीे. त्याचबरोबर मानवी हक्काच्या पातळीवरील परिस्थिती वाईट होत असल्यावरून चिंता व्यक्त करण्यात आली. अमेरिकेस वेस्ट बँकेच्या स्वायत्त सरकारवर अंकुश निर्माण करायचा आहे. त्याचबरोबर पॅलेस्टाइनच्या स्थलांतरितांना संयुक्त राष्ट्राकडून मिळणारा निधी रोखण्याचाही अमेरिकेचा डाव असल्याचा आरोप पॅलेस्टाइनचे वार्ताकार सईब एरेकाट यांनी केला आहे. 


अन्यथा शांततेची योजना जाहीर करू
राष्ट्राध्यक्ष अब्बास वाटाघाटींच्या टेबलावर येऊ इच्छित असल्यास उत्तमच. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तयार आहोत. परंतु त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली नाही तर आम्ही आमची शांततेसंबंधीची योजना जाहीर करू, असा इशाराही कुश्नेर यांनी दिला. 


पॅलेस्टाइनला डावलून उपयोग होणार नसल्याचा इशारा : कुश्नेर यांनी गाझा पट्ट्यासह इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष थांबावा यासाठी शांततेचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर सहमती व्हायला हवी. म्हणूनच पॅलेस्टाइन नेतृत्वाला डावलून काही करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकेचे प्रयत्न निष्फळ ठरतील, असा इशारा राष्ट्राध्यक्ष अब्बास यांचे प्रवक्ते नबील अबू डेनेह यांनी दिला आहे. पूर्व जेरुसलेम राजधानी असलेल्या स्वतंत्र पॅलेस्टाइनला परवानगी देण्याचा त्यांचा उद्देश असला पाहिजे, अशी अट अब्बास यांनी घातली. 


वाटाघाटीतील अडचणी कोणत्या ? 
- गाझा पट्ट्यातील वाढलेला हिंसाचार. 
- पॅलेस्टाइनची अंतर्गत गटबाजी, गाझामध्ये 'हमास' व इस्रायल सैन्य यांच्यातील अलीकडचा संघर्ष. 


'पॅलेस्टाइनच्या नेतृत्वाकडे कृती कार्यक्रमच नाही' 
अमेरिकेने शांतता करार तयार केला आहे. त्याबाबत चर्चा करण्याची तयारी अब्बास यांनी दर्शवल्यास पॅलेस्टाइन नागरिकांसाठी चांगले होईल. परंतु वाटाघाटी करण्याची अब्बास यांच्यात क्षमता दिसत नाही. बहुधा आमची योजना पॅलेस्टाइन लोकांना आवडू शकते, याची त्यांना भीती वाटत असावी. कारण आमच्या शांतता प्रस्तावात पॅलेस्टाइन नागरिकांना चांगले जीवन जगण्याची संधी आहे. खरे तर जागतिक समुदायाचा पॅलेस्टाइन नेतृत्वाकडून अपेक्षाभंग झाला आहे. कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा कृती कार्यक्रम नाही.

बातम्या आणखी आहेत...