आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये विमान कोसळले, 66 जणांचा मृत्यू, मृतांत कर्मचारीही, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान- इराणमध्ये असेमान एअरलाइन्सच्या विमानाला रविवारी झालेल्या अपघातात किमान ६६ जणांचा मृत्यू झाला. त्यात विमान कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. खराब हवामानामुळे हे विमान पहाडाला धडकून कोसळले.  


दोन इंजिन असलेले एटीआर-७२ हे विमान तेहरानहून यासूज शहराच्या दिशेने जात होते. विमानाने तेहरानच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे पाचच्या सुमारास उड्डाण घेतले होते, परंतु काही वेळातच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. यासूज शहरापासून २३ किमी अंतरावरच विमान जगरोस पर्वतरांगेतील देना पहाडाला जाऊन धडकले. असेमान एअरलाइन्सचे प्रवक्ते मोहंमद ताघी तबतबाय म्हणाले, विमानात एका मुलासह ६० प्रवासी व ६ प्रवासी जात होते. या सर्वांचा घटनेत मृत्यू झाला. खराब हवामानामुळे बचाव कार्यासाठी पाठवण्यात आलेले हेलिकॉप्टर देखील घटनास्थळी उतरू शकले नाही. डोंगराळ भाग असल्याने रुग्णवाहिका देखील जाऊ शकली नाही. दरम्यान, सरकारने विमान सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी अमेरिकेकडून काही विमानांची खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले.  


इराणला अमेरिकेची विमाने मिळणार

अणु कार्यक्रमामुळे अमेरिकेने इराणवर जवळपास सर्व प्रकारचे व्यापारी संबंध तोडले आहेत, परंतु विमान विक्रीच्या व्यवहाराला अमेरिकेच्या निर्बंधातून विशेष बाब म्हणून वगळण्यात आले आहे. त्यानुसार ८० जेट इराण एअरला मिळणार आहेत. इराण एअर ही राष्ट्रीय विमानसेवा देणारी कंपनी आहे. त्याशिवाय अमेरिकेकडून १०० एअरबस देखील मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या उत्पादकांनी काही एअरबस जेट तेहरानला रवाना केल्या.  


- असेमन एअरलाइन्सचे विमान ATR-72 कमी लांबीच्या प्रवासासाठी वापरले जाणारे छोटे विमान आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, विमान एमरजंसी लॅन्डिंगसाठी जागा शोधत असल्याचा भास झाला. तेव्हाच विमान कोसळले.

 

१९९० मधील बनावट  
असेमान एअरलाइन्सचे एटीआर-७२ प्रकारातील विमानांच्या ताफ्यात ३६ विमानांचा समावेश आहे. अपघात झालेले विमानही त्याच प्रवासी ताफ्यातील होते. या प्रकारातील विमानांची बनावट १९९० च्या दशकातील आहे.  

 

बचाव कार्यात अडथळे 
अपघात झालेल्या ठिकाणी बचाव पथकांना तातडीने पोहोचता आले नाही. पाच पथकांना रवाना करण्यात आले होते, परंतु अनेक तास उलटूनही या पथकांना घटनास्थळापर्यंत पोहोचता आले नाही. राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी वाहतूक मंत्रालयाला घटनेचा तपास व मदतकार्यात वेगाने प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.  

 

विमान अपघातांत वाढ 

गेल्या काही वर्षांत इराणमध्ये विमान अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१४ मध्ये सीफन एअरलाइन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ३९ जणांना प्राण गमवावे लागले होते.  

 

 

बातम्या आणखी आहेत...