आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉस्को- रशियाच्या राजधानीतून ७१ जणांना घेऊन उड्डाण करणारे विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात सर्वच्या सर्व जणांचा मृत्यू झाला. मॉस्कोच्या बाहेर एका बर्फाच्छादित प्रदेशात ते कोसळले. उड्डाणानंतर चार मिनिटांतच त्याचा संपर्क तुटला होता.
अँटोनोव्ह अॅन-१४८ नावाच्या विमानाने डोमोडेडोव्हो विमानतळावरून यशस्वी उड्डाण केले होते. हे विमान ऑर्स या शहराच्या दिशेने उड्डाण केले होते. मात्र ते रॅमेन्स्की जिल्ह्यात ते कोसळले. विमानात ६५ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज रशियाच्या वृत्तसंस्थांनी व्यक्त केला आहे. विमानाचा अपघात भयंकर असल्याने प्राण वाचण्याची शक्यता नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आहे. रशियाच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने अपघाताचे फुटेज दाखवले. त्यात विमानाचे अवशेष बर्फाच्छादित प्रदेशात विखुरलेल्या स्थितीत दिसून येतात.
काही ठिकाणी ढिगारेही पाहण्यात आले. दरम्यान, रशियात हलक्या वजनाच्या विमानांच्या दुर्घटनांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर २०१६ मध्ये लष्करी विमान काळ्या समुद्रात कोसळून ९२ जण मृत्यूमुखी पडले होते. मार्च २०१६ मध्ये ६२ जण विमान अपघातात मृत्यूमुखी पडले होते.
दृश्यमानता कमी
गेल्या काही दिवसांपासून प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे मॉस्कोसह परिसरातील दृश्यमानता कमी झाली आहे. त्यातून हा अपघात घडून आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.या विमानाची निर्मिती ७ वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडीची गंभीर समस्या नव्हती,असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बचाव पथकाला घटनास्थळी पायी जावे लागले..
विमान कोसळलेला प्रदेश अत्यंत दुर्गम आहे. त्या भागात रस्तेमार्गे जाणे बचाव पथकाला शक्य होऊ शकले नाही. कारण बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फच बर्फाचा थर साचला आहे. त्यामुळे पथकाने जिकिरीने पायीच हे अपघातस्थळ गाठले. १५० जणांना या भागात तैनात करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.