आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवळील व्यक्तीचा हात हातात घेतल्यास मेंदूच्या लहरी जुळतात, वेदनेची जाणीव होते कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - आपल्या जवळील व्यक्तीचा हात हातात घेतल्यावर वेदना आणि दु:ख कमी का होते याचा पहिल्यांदा वैज्ञानिकदृष्ट्या उलगडा झाला आहे. अमेरिकेतील कोलाराडो विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, जेव्हा प्रिय असणाऱ्या व्यक्तीचा आपण हात पकडतो तेव्हा दोन्ही लोकांच्या मेंदूच्या लहरी (ब्रेन वेव्ह) आणि हृदयाचे ठोके (हार्ट बीट) एका लयीत येतात आणि दोन्ही लोकांना शारीरिक व मानसिक वेदना कमी झाल्याचा अनुभव होतो.


मेंदूच्या लहरी, हृदयाचे ठोके आणि मानवी स्पर्श यांना केंद्रस्थानी ठेवून वैज्ञानिकांनी २३ ते ३२ वर्षे वयोगटातील २२ लोकांवर संशोधन केले. संशोधनासाठी मानसिक, शारीरिक व्याधी असणाऱ्या लोकांना निवडून दोन-दोन जणांचे समूह तयार केले. त्यानंतर तीन वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांना तपासले गेले. पहिल्या टप्प्यात प्रत्येक समूहातील लोकांना वेगवेगळ्या खोलीत बसवले. दुसऱ्या टप्प्यात एका तासापर्यंत लोकांना एकमेकांपासून दूर बसायचे होते. तिसऱ्या टप्प्यात लोकांना एक-दुसऱ्याचे हात पकडून एकत्र बसण्याची मुभा होती. या दरम्यान दोघांची मानसिक स्थिती बदलण्याची प्रक्रिया, मेंदूतील लहरींचे आदान-प्रदान तपासले. याला इलेक्ट्रोइन्सेफेलोग्रापी (ईईजी) असे नाव दिले. जे लोक हातात हात घेऊन बसले होते त्यांची मानसिक स्थिती उत्तम असून वेदना कमी जाणवत असल्याचे स्पष्ट झाले.  


संशोधनकर्त्यांनी सांगितले की, वेदनेवेळी मेंदूतून ज्या लहरी बाहेर पडतात त्यांना अल्फा म्यू बँड म्हणतात. जेव्हा दोन्ही लोकांच्या लहरी एकत्र येतात तेव्हा त्याचे रूपातंर ऊर्जेत होते. जेव्हा दोघातील एका व्यक्तीला वेदना होते तेव्हा त्याच्या मेंदूतून बाहेर पडणाऱ्या नकारात्मक अल्फा म्यू बँड, दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूतून बाहेर पडणाऱ्या सकारात्मक अल्फा म्यू बँडशी संतुलित होते. त्यामुळे पहिल्या व्यक्तीच्या वेदनेचा अनुभव कमी होतो.

 

संवाद क्रांतीच्या युगात आपण थेट संवाद विसरतोय
संशोधन करणाऱ्या टीमचे प्रमुख प्रा. पॅवेल गोल्डस्टीन म्हणाले की, संवाद क्रांतीच्या युगात दूरवर असलेल्या लोकांशी संवाद साधण्याची अनेक माध्यमे सध्या उपलब्ध झाली आहेत. पण थेट संवाद आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे अतिशय गरजेचे झाल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे संशोधन पीएनएएस नावाच्या विज्ञानविषयक मासिकात प्रकाशित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...