आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जॅकब झुमा यांचा राजीनामा; रामाफोसा राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग- भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जॅकब झुमा यांनी अखेर राजीनामा सादर केला आहे. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) या त्यांच्या पक्षाने तीन दिवसांपूर्वी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी नकार दिला होता. अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या शक्यता दिसून आल्यानंतर झुमांनी राजीनामा सादर केला. ७५ वर्षीय झुमाांनी बुधवारी उशिरा टीव्ही प्रसारणात आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. मी पदाचा तत्काळ राजीनामा देत असल्याचेे त्यांनी सांगितले. दरम्यान, संसदेत एएनसीचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 


 झुमा २००९ पासून राष्ट्राध्यक्षपदी होते. २०१९ च्या अखेरीस त्यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण होणार होता. त्यांचा पक्ष आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) ने सोमवारी झालेल्या बैठकीत झुमांना पद सोडण्याचे आदेश दिले होते. त्यांनी त्या वेळी नकार दिला. एएनसीने विरोधी पक्षांसह मिळून अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. परिस्थिती पाहून त्यांनी राजीनामा दिला.  

पक्षाच्या निर्णयाशी असहमत  
राजीनामा देण्यापूर्वी केलेल्या भाषणातून झुमा यांनी पक्षाच्या निर्णयाशी आपण असहमत असल्याचे सांगितले. झुमा यांनी सांगितले की, एएनसीमध्ये हिंसा आणि फूट पडल्याने नाइलाजास्तव आपण राजीनामा देत आहोत. माझ्यामुळे कोणाचा जीव जाता कामा नये. माझ्यामुळे पक्षात दुफळी माजावी असेही मला वाटत नाही. त्यामुळेच आपण पदाचा तत्काळ राजीनामा देत आहोत. 
 
थाबो मबेकीने बनवले होते उत्तराधिकारी 
 
जॅकब झुमा यांना २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थाबो मबेकी यांनी आपले उत्तराधिकारी निवडून पक्ष सदस्यांना चकित केले होते. कारण २००५ मध्ये मबेकी यांनी झुमांना आपला सहायक नियुक्त करण्यास नकार दिला होता. त्या वेळी झुमांवर लैंगिक अत्याचारांचे आरोप होते.
 
 
झुमांच्या राजीनाम्याने भ्रष्टाचार थांबणार नाही : अहमद काठराड फाउंडेशन 
द. आफ्रिकेतील भ्रष्टाचाराचा एक अध्याय समोर आला आहे. झुमांच्या राजीनाम्याने भ्रष्टाचार संपला असे सिद्ध होत नाही, असे भ्रष्टाचारविरोधी अहमद काठराड फाउंडेशनने म्हटले आहे. अहमद काठराड  हे भारतवंशीय कार्यकर्ता होते. त्यांनी २६ वर्षे द. आफ्रिकेच्या तुरुंगात घालवले.  गेल्या वर्षी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. वर्णभेदी सरकारविरुद्ध त्यांनी लढा दिला होता. त्यांच्या नावे चालवण्यात येणाऱ्या संस्थेचे संचालक निशान बाल्टन यांनी राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. २ वर्षांपूर्वी काठराड यांनी सरकारला पत्र लिहून झुमांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. ते आज हवे होते, अशी भावना निशान बाल्टन यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळ आणि बाह्य घटकांमुळे भ्रष्टाचार वाढत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...