आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मीडियाने ट्रम्प यांनाच ठरवले देशद्रोही! माघारी शत्रू मानणाऱ्या पुतिन यांचे कौतुक करणे भोवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - नेहमीच चर्चेत राहणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता त्याच्याच देशातील मीडिया देशद्रोही ठरवत आहे. फिनलंड येथील संमेलनात त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. विशेष म्हणजे, ट्रम्प माघारी असताना ज्या रशिया आणि त्याच्या राष्ट्राध्यक्षाला जगाचा सर्वात मोठा शत्रू मानत होते, त्याच नेत्याचे प्रत्यक्ष भेटीत ट्रम्प यांनी तोंडभर कौतुक केले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असलेली व्यक्ती इतकी मोठी पलटी मारूच कशी शकते असा सवाल अमेरिकन मीडियामध्ये उपस्थित केला जात आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाने काहीच फेरफार केला नव्हता. अमेरिकेने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप मूर्खपणा होता असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. 

 

फिनलंड येथील समिटमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यानंतर दोघेही हसतमुखाने एकत्रित बाहेर पडले आणि माध्यमांशी संयुक्त संवाद साधला. यात सुरुवातीला पुतिन म्हणाले, "ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवडून यावे ही माझी इच्छा होती. परंतु, त्यांना निवडणुकीत विय मिळवून देण्यात रशियाचा हात नाही." यावर ट्रम्प यांचे उत्तर धक्कादायक होते. नेहमीच ज्या पुतिनवर ते आपल्या देशात टीका करत होते. निवडणुकीत फेरफार करण्यासाठी जबाबदार धरत होते त्याच नेत्याचे त्यांनी जाहीर समर्थन केले. ट्रम्प म्हणाले, "पुतिन जे काही म्हणाले ते खरे आहे. अमेरिकेने यासंदर्भात लावलेले आरोप अर्थातच मूर्खपणा होता." अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी सुद्धा अहवाल सादर करून म्हटले होते की रशियाने निवडणुकीत फेरफार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रम्प यांनी पुतिन यांचे समर्थन करून आपल्यासह गुप्तचर संस्था, तपास संस्था आणि समस्त अमेरिकेला खोटे सिद्ध केले आहे.

 

1) द वॉशिंग्टन पोस्टने लिहिले...
ट्रम्प यांनी पुतिन यांचे समर्थन करून आपले सल्लागार आणि नियोजित प्लॅनच्या विरोधात जाऊन केले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांचे काहीच ऐकूण घेतले नाही. त्यांच्यासोबत फिनलंडला गेलेल्या अधिकाऱ्यांनी पुतिन यांच्याशी बोलताना काय बोलावे आणि कसे बोलावे याचे 100 पानी निर्देश समजावून सांगितले होते. त्यामध्ये अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाची ढवळाढवळ हा मुद्दा आक्रमकपणे मांडणे अपेक्षित होते. परंतु, ट्रम्प यांनी त्यावर दुर्लक्ष करून मनात येईल ते म्हटले आणि आपल्याच शैलीत संमेलन हाताळले.


2) द न्यूयॉर्क टाइम्सकडून टीका
परदेशात राष्ट्राध्यक्षांनी कसे बोलावे यासंदर्भात शिष्टाचार पाळणे अपेक्षित असते. परंतु, ट्रम्प यांनी त्या सर्व निती निर्देशक तत्वांचे सर्रास उल्लंघन केले. 'ट्रम्प फिनलंडला जातात. त्यांच्यापूर्वी कुठलेही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष तेथे गेले नाहीत. तेथे जाऊन शत्रू राष्ट्राच्या नेत्याशी संवाद साधतात. तसेच त्याने दिलेल्या स्पष्टीकरणाचे समर्थन करून आपल्या देशातील तपास संस्थांना खोटे ठरवतात. ट्रम्प यांनी जे काही केले ते परदेशात कुठल्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने केलेले नाही.' न्यूयॉर्क टाइम्सने सीआयएचे माजी संचालक जॉन ब्रेनन यांचा दाखला देत ट्रम्प यांचे हे वर्तन देशद्रोहापेक्षा कमी नाही असे म्हटले आहे. 


3) ट्रम्प यांच्या कार्यकाळातील सर्वात लाजिरवाणा क्षण -सीएनएन
अमेरिकन न्यूज चॅनल सीएनएनने सुद्धा ट्रम्प यांच्या विधान आणि वर्तणुकीवर टीका केली. परदेशात जाऊन एका राष्ट्राध्यक्षाने आपल्या देशातील तपास संस्थांचा अपमान करणे अतिशय चुकीचे आहे. त्यातही ट्रम्प यांनी आपल्या शत्रू देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या शेजारी बोलताना अमेरिकन तपास संस्थांना खोटे ठरवले आहे. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष काळातील हा सर्वात लाजिरवाणा क्षण आहे असे विश्लेषण केले आहे. सोबतच विरोधी पक्षांच्या नेत्यांना चॅनलच्या व्यासपीठावर बोलावले असताना त्यांनी ट्रम्प यांना देशद्रोही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...