आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गद्दाफीसारखेच हाल होतील; ट्रम्प यांची किम यांना धमकी; जनावर शब्दाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - उत्तर कोरियासोबत निर्धारित शिखर चर्चा झाली नाही तर अमेरिका पुढील पाऊल उचलेल, कूटनीती अपयशी ठरल्यास लिबियासारखी स्थिती निर्माण होईल आणि किम जोंग उन यांची स्थिती मुअम्मर अल-गद्दाफी यांच्यासारखीच होईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. या एेतिहासिक चर्चेविषयीचा उत्तर कोरियाचा पवित्रा बदलल्याबद्दल त्यांनी चीनला जबाबदार ठरवले आहे.  


सिंगापूरमध्ये ट्रम्प आणि किम यांच्या होणाऱ्या शिखर चर्चेवर आता अनिश्चिततेचे सावट आहे. कारण उत्तर कोरियाने मंगळवारी अमेरिकेवर एकतर्फी अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाचा आरोप करत १२ जूनला होणाऱ्या चर्चेपासून मागे हटण्याची धमकी दिली होती. उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील लष्करी सरावावरही आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात पत्रकारांशी चर्चा केली. ते म्हणाले की, पुढे काय होते त्याकडे आमचे लक्ष आहे.

 

बैठक झाली तर ठीकच...पण जर झाली नाही तर आम्ही पुढील पाऊल उचलू.  किम यांना सत्तेत राहायचे असेल तर अण्वस्त्रांचा त्याग करावा, असा सल्ला ट्रम्प यांनी त्यांना दिला. तसेच कूटनीती अयशस्वी झाल्यास लिबियासारखी स्थिती निर्माण होऊ शकते आणि किम जोंग उन यांची स्थितीही लिबियाचा नेता मुअम्मर अल-गद्दाफी याच्यासारखी होऊ शकते, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. गद्दाफीला सत्तेतून हटवून त्याची हत्या करण्यात आली होती. उत्तर कोरियाने शिखर चर्चेबाबतची भूमिका अचानक कशी बदलली, या प्रश्नावर ट्रम्प म्हणालेे की, किम यांची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाल्यानंतर काही गोष्टी ‘अचानक’ बदलल्या.

 

‘जनावर’ शब्दाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया  
ट्रम्प यांनी काही अवैध प्रवाशांसाठी ‘जनावर’ शब्द वापरला होता. ट्रम्प यांनी त्या टिप्पणीचा बचाव करताना म्हटले की, हिंसाचार करणाऱ्या टोळ्यांच्या सदस्यांसाठी मी त्या शब्दाचा वापर करत राहीनच.  

 

 

बातम्या आणखी आहेत...