आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामविरोधी ट्विट केल्याने भारतवंशीय शेफवर संकट; दुबईत टीकेची झोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई -  संयुक्त अरब अमिरातीतील लोकप्रिय भारतवंशीय शेफ अतुल कोचर यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी इस्लामविरोधी ट्विट टाकल्याचा आरोप असून जाहीर माफी मागावी, अशी मागणी दुबईतील नागरिकांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘रंगमहाल’ रेस्तराँचे ते मालक आहेत. हे रेस्तराँ खास भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.  


असा झाले ट्विटवरून वाद - बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमेरिकेतील टीव्ही मालिका ‘क्वांटिको’ मध्ये काम करत आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये पोस्ट केले होते की, ‘ या मालिकेत हिंदू राष्ट्रांत राहणाऱ्यांना दहशतवाद्याप्रमाणे दाखवले जाते.’ हे वृत्त दुबईतील खलिज टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले. त्यावर अतुल कोचर यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट केले की, ‘ तू (प्रियंका) असे ट्विट करावेस हे खेदजनक आहे. हिंदूंच्या भावनांचा तू आदर केला नसून इस्लामी दहशतवादाचे ते २००० वर्षांपासून बळी ठरले आहेत.’ कोचर यांच्या ट्विटनंतर दुबईतील माध्यमांनी व प्रतिष्ठितांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला. कोचर यांनी आपले ट्विट काही वेळातच डिलीट केले आहे. त्यांनी जाहीर माफीही मागितली आहे.  


कोचर यांच्या ट्विटनंतर अनेकांनी ‘रंगमहाल’ रेस्तराँची मान्यता काढून घेण्याची मागणीही केली आहे. प्रसिद्ध बल्लवाचार्याचा खरा चेहरा आता दुबईकरांना दिसला आहे, अशी टीकाही करण्यात आली. काही फेसबुक वापरकर्त्यांनी लिहिले की, आम्ही यापुढे ‘रंगमहाल’मधील अन्न घेणार नाही. अनेक ग्राहकांनी आपल्या पुढील ऑर्डर्स रद्द केल्या आहेत. जे.डब्ल्यू. मेरिएट हॉटेलमध्ये ‘रंगमहाल’ रेस्तराँ आहे. मेरिएट व्यवस्थापनाने वादाशी संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.  

 

इस्लाम स्थापनेला १४०० वर्षे झाली आहेत - कोचर  
इस्लामच्या स्थापनेला १४०० वर्षे झाली आहेत. आपले ट्विट तथ्यात्मक नाही. मी माफी मागतो. मला इस्लामफोबिया नाही. माझ्या ट्विटमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे ट्विट कोचर यांनी सोमवारी केले. प्रसिद्ध अरब पत्रकार खालेद अलमीना यांनी कोचर यांच्यावर टीका केली. ‘तुमचे ट्विट भयानक असून तुम्ही मला दुखावले आहे. मी भारतावर प्रेम करणारा आहे. जात-पंथाच्या पलीकडे भारत असून हे ट्विट खेदजनक आहे’, असे अलमीना यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...