आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धबंदीसाठी सुरक्षा परिषदेत मंजुरी; मात्र हिंसाचार सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र- हिंसाचारात होरपळणाऱ्या सिरियात ३० दिवसांसाठी युद्धबंदी लागू करण्याच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजुरी मिळाली आहे. ही युद्धबंदी विनाविलंब लागू करण्याचा निर्णय झाला असला तरी रविवारी पूर्वेकडील घौउतामध्ये सिरियन समर्थक गट व बंडखोरांतील संघर्षात किमान १३ जण ठार झाले.  


पूर्व घौउता भागात इसिसचे दहशतवादी दडून बसले आहेत. त्यांच्या विरोधात सिरियन सैन्याने मोठी मोहीम हाती घेतली आहे. युद्धबंदीच्या निर्णयामुळे सिरियातील सरकारने नागरिकांसाठी गोळीबार तसेच हल्ले थांबवावेत, असे आंतरराष्ट्रीय संघटनेने स्पष्ट केले आहे. अल-कायदा व नुसरा फ्रंटच्या दहशतवाद्यांनी या प्रदेशात हिंसाचार वाढवला आहे. त्यांचा खात्मा करण्यासाठी सिरियाच्या सरकारने रशियाच्या मदतीने गेला आठवडाभर हवाई हल्ले केले. त्यात अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले.  कुवैत, स्वीडनसारख्या देशांनी यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, सिरियात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच हिंसाचाराला सुरूवात झाली होती.  


‘मूलभूत हक्कांचे संरक्षण आवश्यक’  
सिरियातील हिंसाचार थांबणे गरजेचे आहे. तूर्त युद्धबंदी लागू झाली तर मानवी हक्काचे संरक्षण करणे शक्य होणार आहे. त्यामुळेच सिरियन सरकार, बंडखोर तसेच इतर गटांनी आंतरराष्ट्रीय मानवी आणि मानवी हक्कविषयक कायद्यांंतर्गत येणाऱ्या कर्तव्यांची देखील जाणीव ठेवली पाहिजे, याचे स्मरण गुटेरस यांनी करून दिले. सिरियातील युद्धबंदीसाठी प्रस्ताव- २४०१ यावर दोन आठवडे चर्चा चालली. त्यानंतर शनिवारी सुरक्षा परिषदेने या प्रस्तावाला सर्वानुमते मंजूर केले.  


मृतांची संख्या ५१९ वर पोहोचल्याचा दावा 
पूर्वेकडील घौउता प्रदेशातील हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. गेल्या सात दिवसांपासून असाद सरकारने हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या ५०० पेक्षा जास्त झाली आहे. एकूण ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांत १२७ मुलांचा समावेश आहे. शनिवारच्या चकमकीत ४१ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात ८ मुलांचा समावेश आहे.  


युद्धबंदीचे गुटेरस यांच्याकडून स्वागत  
सरचिटणीस गुटेरस यांनी सुरक्षा परिषदेद्वारे सिरियात ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. या प्रस्तावामुळे मानवी मदत तसेच इतर सेवांचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. गंभीर स्वरूपाचा आजार किंवा जखमींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धबंदी लवकरच लागू केली जाईल, अशी ग्वाही गुटेरस यांनी दिली.  

बातम्या आणखी आहेत...