आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीव संकट: चीनने पूर्व हिंदी महासागरात 11 युद्धनौका केल्या तैनात, चीनची रणनीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय/ माले- मालदीवमध्ये राजकीय संकट असून चीनने आपल्या ११ युद्धनौका पूर्व हिंदी महासागरात पाठवल्या आहेत. मालदीवमध्ये सध्या राजकीय आणीबाणी असून याचा अवधीही सोमवारी वाढवण्यात आला होता. या युद्धनौका चीन कुठे तैनात करणार आहे याविषयी चिनी माध्यमांनी काहीच माहिती दिलेली नाही. या ताफ्यामध्ये एक फ्रिगेट जहाज, ३० हजार टनांची एम्फिबियस ट्रान्सपोर्ट डॉक, तीन सपोर्ट टँकर सामील आहेत. चिनी माध्यमांच्या वृत्तांत हा तपशील दिला आहे. हा नौदलाचा ताफा कुठे आणि किती वेळ तैनात केला जाईल याविषयी माहिती दिलेली नाही.  


या वृत्ताविषयी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीचे संकेतस्थळ ‘न्यूज डॉट कॉम एयू’ नुसार चिनी युद्धनौकांची तैनाती भारताच्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी केली आहे. मालदीवपासून भारताने दूर राहावे यासाठी चीनने हा निर्णय घेतला. मालदीवचे निर्वासित माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद नशीद यांनी देशातील पेच सोडवण्यासाठी भारताने सैन्य पाठवण्याचे अपील केले होते. चीनने मालदीवमध्ये परकीय सैन्याने हस्तक्षेप करू नये, असे सांगितले होते.  


मालदीवमधील न्यायपालिकेला स्वायत्तता मिळावी; भारताचे मत
मालदीवची संसद पीपल्स मजलिसच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गय्यूम यांचा आणीबाणी अवधी वाढवण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. त्यानंतर आणीबाणीचा अवधी ३० दिवसांनी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी १५ दिवसांसाठी आणीबाणी लागू केल्याची घोषणा केली होती. भारताने मालदीव सरकारला इशारा दिला की, त्यांनी आणीबाणी संपुष्टात आणावी. न्यायपालिकेचे काम सुरू राहावे. तिच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचू नये, असे मत भारताने व्यक्त केले होते.

 

श्रीलंकेचा आणीबाणीला विरोध : कारू जयसूर्या
कोलंबो- अब्दुल्ला यामीन यांनी आणीबाणीचा कालावधी वाढवल्याबद्दल श्रीलंका संसदेतूनही विरोधाचा सूर उमटला. यामीन यांच्या कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेला धोका आहे.  घटनात्मक पेच असल्याने आणीबाणीचा कालावधी वाढवणे अपरिहार्य आहे. यामीन यांना संसदेत बहुमत आहे कारण विरोधी पक्षाचे खासदार तुरुंगात आहेत. श्रीलंका संसदेचे सभापती कारू जयसूर्या यांनी म्हटले की, आणीबाणीची प्रक्रिया घटनाबाह्य आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेने म्हटले की, लोकशाही तत्त्वांना फेटाळून यामीन मनमानी करत आहेत. राजकीय विरोधकांना मुक्त करण्यात यावे. 

बातम्या आणखी आहेत...