आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंचभरही भूमी देणार नाही; रक्तपात झाला तरी बेहत्तर; जिनपिंग यांची इशारावजा धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनने ज्या भूप्रदेशांवर दावा सांगितला आहे त्यातील इंचभर भूमीसाठीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी रक्तपात करावा लागला तरीही चीन सज्ज आहे. इतरांनी तसे सज्ज राहावे, अशा शब्दांत  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनने इशारावजा धमकी दिली आहे.

 

राष्ट्राध्यक्षपदी आजीवन राहण्याची सोय करून घेतल्यानंतर जिनपिंग यांचे हे पहिलेच आक्रमक वक्तव्य आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये जिनपिंग यांनी ३० मिनिटांचे भाषण केले. त्यात त्यांनी ही भूमिका मांडली. ‘ग्रेट चीनचे’ स्वप्न आपण उराशी बाळगले असल्याचे ते म्हणाले.   
या भाषणादरम्यान वर्चस्व मिळवलेल्या प्रदेशाच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला नाही. भारत, जपान, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, तैवान, मलेशिया, ब्रुनेई या देशांशीदेखील प्रदेशावरून चीनचे वाद आहेत.   नॅशनल पीपल्स काँग्रेस ही चीनची शक्तिहीन संसद मानली जाते. याच्या वार्षिक सत्राच्या समारोपामध्ये चीनच्या पंतप्रधानांचे भाषण दरवर्षी होत असते.

 

‘साम्राज्यवादी धोरण बाळगणार नाही’
चीन कधीही इतर देशांवर साम्राज्यवादी धोरणाचा अवलंब करणार नाही. इतरांसाठी धोका असलेले लोक इतरांपासून धोका असल्याचा दावा करतात. इतर देश व तेथील लोकांच्या भलाईसाठी चीनच्या निर्णयांना चुकीचे समजू नये. कारण अखेर विजय सत्याचा होतो. जिनपिंग म्हणाले, जनता हेच चीनचे हिरो आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी जनतेच्या हितासाठी कठोर कष्टाची तयारी ठेवली पाहिजे.

 

माआेत्से तुंग नंतरचे जिनपिंग सर्वात शक्तीशाली नेते
चीनची संसद एनपीसीच्या अधिवेशनात राष्ट्राध्यक्ष पदाची दोन वर्षांची अनिवार्यता संपुष्टात आणली आहे. त्यामुळे जिनपिंग यांचा हयातभर पदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये शी यांना सलग दुसऱ्यांदा चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस पदी निवडण्यात आले होते. ते पक्षाबरोबरच लष्कराचे प्रमुख देखील आहेत. जिनपिंग माआेत्सेनंतरचे सर्वात शक्तीशाली नेते बनले आहेत. पक्ष संविधानात  ‘शी जिनपिंग यांची विचारप्रणाली’चाही समावेश झाला आहे.

 

चीनचे अनेक देशांसोबत सीमावाद : चीनचे भारतासोबतच नव्हे तर व्हिएतनाम, फिलिपीन्स,मलेशिया, ब्रुनेई, तैवानसोबतही दक्षिण चिनी सागरी वाद सुरू आहे. या सागरी क्षेत्रात चीनने बेटांचा विकास करण्याच्या नावाखाली प्रदेशात आपला दबदबा वाढवण्याचाही प्रयत्न केला आहे.

 

तैवान आणि हाँगकाँगच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना दिला इशारा : शी जिनपिंग यांनी चीनचा गौरवशाली इतिहासाची देखील यानिमित्ताने उजळणी केली. चीनने जगाला वृत्तपत्र, कन्फ्युशियसवाद व चिनी भिंत इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. चीनने बाह्य आक्रमणांचा सामना केला आहे. तैवान व हाँगकाँगसंबंधी समुदायालाही त्यांनी इशारा दिला.

 

१७० वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होणार   
जगामध्ये महासत्ता म्हणून प्रस्थापित होण्याचे स्वप्न चीन १७० वर्षांपासून पाहत आहे. आता ते लवकरच पूर्ण होणार असून याचे श्रेय चीनच्या १.३ अब्ज जनतेचे आहे. अखंड चीन हा चिनी विचारधारेचा पाया आहे. तैवानचा उल्लेख न करता शी जिनपिंग यांनी, मातृभूमीचे विभाजन सहन करणार नाही, असा इशारा दिला.

 

 

बातम्या आणखी आहेत...