आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन भारताला ब्रह्मपुत्रा नदीच्या जलविद्युतसंबंधी माहिती देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्विपक्षीय चर्चेपूर्वी जुन्या बैठकांच्या छायाचित्रांचा अल्बम मोदी यांना दाखवताना राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. - Divya Marathi
द्विपक्षीय चर्चेपूर्वी जुन्या बैठकांच्या छायाचित्रांचा अल्बम मोदी यांना दाखवताना राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग.

क्विंग्डाआे - चीनच्या क्विंग्डाआे शहरात १८ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीआे) बैठकीला शनिवारी सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सहभागी झाले. तत्पूर्वी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. चार वर्षांत उभय नेत्यांमधील ही १४ वी आणि दीड महिन्यातील दुसरी भेट होती. मोदी व जिनपिंग यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत व चीन यांच्यातील मजबूत व स्थिर संबंधांमुळे जगात स्थैर्य व शांतता नांदण्यासाठी प्रेरणा मिळू शकते, असे मोदी यांनी म्हटले आहे.   


मोदींनी बैठकीदरम्यान वुहानमध्ये जिनपिंग यांच्याशी झालेल्या अनौपचारिक बैठकीचेही स्मरण केले. भारत-चीन दरम्यान दोन करार झाले. त्यात चीनने भारताला ब्रह्मपुत्रा नदीच्या जलविद्युत संबंधी माहितीचे देवाण-घेवाण करण्याचे मान्य केले. बासमती तांदुळाच्या निर्यातीसंबंधी मसुद्यामध्ये दुरुस्तीवरही उभयतांत सामंजस्य करार झाला.    मोदींनी एससीआेचे सरचिटणीस राशिद अलिमोव यांचीही भेट घेतली. उज्बेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकात मिरजियोयेव यांच्याशी देखील द्विपक्षीय चर्चा केली.

 

मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनाही भेटले. एससीआेमध्ये क्षेत्रीय सुरक्षा व दहशतवादावर चर्चा होणार आहे. त्यात पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचाही मुद्दा मोदी मांडू शकतात. पूर्णवेळ सहभागी होण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.  

 

पुतीन यांचा फ्रेंडशिप पदकाने केला गौरव
चीन व रशियाच्या मैत्रीला शनिवारी नवीन पैलू मिळाला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना चीनचे पहिले फ्रेंडशिप मेडल घालून गौरव केला. हा कार्यक्रम राजधानी बीजिंगच्या ग्रेट हॉल ऑफ पीपलमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास कम्युनिस्ट पार्टीच्या स्थायी समितीच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. पुतीन यांना पीपल लिबरेशन आर्मीच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आले. चीन व रशियाचे राष्ट्रगीत या वेळी ऐकवण्यात आले. कार्यक्रमास ७०० हून जास्त लोक उपस्थित होते. 

 

नाटो व जी-७ देश एससीआेला आपले प्रतिस्पर्धी मानत असल्याने अडचण    
पश्चिमेकडील देशांची संघटना नाटो व जी-७ संघटना एससीआेला आपले प्रतिस्पर्धी मानते. शीतयुद्धाच्या काळात नाटोच्या निशाण्यावर सोव्हिएत संघ होता. जी-७ श्रीमंत देशांची संघटना आहे. २०१४ मध्ये रशियाला बाहेर करण्यात आले होते. दोन्ही संघटनांचे अमेरिका नेतृत्व करते. एससीआेचे नेतृत्व रशिया व चीन करते. एससीआेच्या स्थापनेचा उद्देश सदस्य राष्ट्रांतील सुरक्षा सहकार्य व आर्थिक विकासाचे कार्यक्रम वाढवणे असा आहे.   


‘वन बेल्ट वन रोड’चा अजेंडा हेच भारतासाठी सर्वात मोठे आव्हान 
चीनचा वन बेल्ट वन रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यास भारताचा विरोध आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक कटू संबंधदेखील एससीआेसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. कारण दोन्ही देश या संघटनेचे सदस्य आहेत. त्याशिवाय युक्रेनवरून रशिया व चीन यांच्यातही तणाव आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने आेबीआेआरमध्ये १०० देशांना सहभागी करून घेतले आहे. चीन या संमेलनात सदस्य तसेच निरीक्षक देशांसमोर या प्रकल्पाचा आराखडा मांडू शकतो. या प्रकल्पामुळे कोणत्या देशाला कसा लाभ मिळेल,  हे चीन स्पष्ट करू शकेल.   

बातम्या आणखी आहेत...