आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या जेरुसलेम निर्णयामुळे ख्रिसमसच्या उत्साहाचा हिरमोड; ख्रिश्चन नागरिक नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेथलहेम / जेरुसलेम- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमला अमेरिका मान्यता देत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे येथील ख्रिसमसच्या उत्साहावर विरजण पडल्याचे चित्र आहे. ज्यू धर्मीयांच्या बाजूने अमेरिकेची भूमिका असल्याचे येथील ख्रिस्ती नागरिकांना वाटत आहे. दरवर्षी जेरुसलेममध्ये प्रचंड संख्येने ख्रिश्चन पर्यटक येतात व ख्रिसमस साजरा करतात. यंदा मात्र उत्साह कमी दिसला. ख्रिस्ती बांधवांनी उत्सवात सहभागी होण्याचे टाळले. 

 
बेथलहेम (पॅलेस्टाइन) येथील मॅनगर स्क्वेअर येथे येशूचा जन्म झाला होता, असे समजले जाते. दरवर्षी येथे लाखो ख्रिस्ती पर्यटक ख्रिसमसनिमित्त मोठा जल्लोष करतात. मध्यरात्रीच्या सामुदायिक प्रार्थनेसाठीदेखील मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव जमा होतात. यंदा दुकानदार व फेरीवाल्यांच्या चेहऱ्यावर ख्रिसमसच्या दिवशी निराशाच दिसून आली. येथील एक दुकानदार मायकल कुमसीयेह यांनी, डोनाल्ड ट्रम्प या निरुत्साहाला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांना समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी समस्या वाढवू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.  

अमेरिकेने संघर्षात भर टाकली

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे इस्रायल - पॅलेस्टाइन वादात तेल आेतले आहे. त्यांनी हा वाद अधिक उग्र केल्याची प्रतिक्रिया बेथलहेमचे महापौर अँटॉन सलमान यांनी दिली. सलमान हे रोमन कॅथोलिक समुदायाचे आहेत. बेथलहेम मुस्लिमबहुल (७०%)  असूनही त्यांची महापौरपदी ६ महिन्यांपूर्वी निवड झाली होती. येथे ३०% नागरिक ख्रिश्चन आहेत. पूर्वी येथे ख्रिश्चनांची संख्या अधिक होती. आर्थिक मंदी आणि युद्धस्थ स्थितीमुळे अनेक ख्रिस्ती बांधवांनी स्थलांतर केले. बेथलहेममधील प्रत्येक नागरिक ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करत असल्याचे महापौरांनी सांगितले. आमच्या राष्ट्राच्या भवितव्याविरुद्ध ट्रम्प यांची घोषणा आहे. 

 

आनंदी राहण्याचे आवाहन : ट्रम्प यांच्या निर्णयाचा तणाव न घेता ख्रिसमसचा आनंद साजरा करावा, असे आवहान आर्चबिशप पिझ्झाबल्ला यांनी केलेे. पिझ्झाबल्ला हे येथील सर्वात वरिष्ठ रोमन कॅथॉलिक धर्मगुरू आहेत. मध्यरात्रीची सामुदायिक प्रार्थना त्यांनी घेतली. राजकीय नेत्यांनी संयमाने वागावे. सर्व नागरिकांच्या हिताचे निर्णय त्यांनी घ्यावेत, असे आवहान पिझ्झाबल्ला यांनी प्रार्थनेनंतर केले.  

 

 

ग्वाटेमालाचा दूतावास जेरुसलेमला हलवणार   
ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष जिमी मोरालेस यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराला समर्थन देत ते आपला दूतावास इस्रायलची राजधानी जेरुसलेम येथे हलवणार आहेत. याविषयी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. फेसबुकवर मोरालेस यांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली.

 

मी ख्रिस्ती बांधवांचा गाइड असेन : बेंजामिन नेतन्याहू  
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जगभरातील ख्रिश्चन बांधवांना जेरुसलेमला येण्याचे आवाहन केले आहे. पुढील ख्रिसमला मी तुमचा गाइड असेन, असे वचन नेतन्याहूंनी जगभरातीत ख्रिस्ती बांधवांना दिले. जेरुसलेममधील प्रत्येक धार्मिक स्थळ पवित्र आहे व त्याचे पावित्र्य आपण राखू. ज्यू, मुस्लिम, ख्रिस्ती भाविकांना येथे कोणताही त्रास होणार नाही. ख्रिसमसच्या सायंकाळी मी येथे पवित्र शहरात उभा आहे, असे व्हिडिआे संदेशात बेंजामिन यांनी दाखवले आहे. इस्रायलचा प्रमुख असल्याचा अभिमान असून मी प्रत्येकाला ‘मेरी ख्रिसमस’च्या शुभेच्छा देत आहे. येथे ख्रिश्चन धर्माचा दबदबा अबाधित राहील, असे मी वचन देतो.  

बातम्या आणखी आहेत...