आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वॉशिंग्टन - एच-१ बी व्हिसाधारकाची पती किंवा पत्नी आगामी काळात अमेरिकेत नोकरी करू शकणार नाही. कारण, अशा परमिटवर पूर्णत: बंदी आणण्याची योजना ट्रम्प प्रशासन आखत आहे. याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेत विविध क्षेत्रांत कार्यरत भारतीयांवर होणार आहे. कारण, सर्वाधिक एच-१ बी व्हिसा घेणाऱ्यांत भारतीयांचीच संख्या अधिक आहे.
एच-१ बी व्हिसाधारक व्यक्तीने अमेरिकेत कायमस्वरूपी नागरिकत्वाच्या दृष्टीने ग्रीनकार्डसाठी अर्ज दिलेला असेल तर त्याच्या जोडीदाराला वर्क परमिट म्हणून एच-४ व्हिसा देण्याची तरतूद अमेरिकी नियमांत आहे. ओबामा सरकारने २०१५ मध्ये हा नियम लागू केला होता. नेमकी ही तरतूद ट्रम्प प्रशासन रद्द करणार आहे. अमेरिकी नागरिकत्व व इमिग्रेशन विभागाचे संचालक फ्रान्सिस सिसना यांनी ही माहिती दिली.
या उन्हाळ्यातच हे आदेश जारी होऊ शकतील, असे ते म्हणाले.
बाय अमेरिकन, हायर अमेरिकन...
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या “बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अमेरिकेत स्थानिकांनाच जास्तीत जास्त रोजगार मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे.
एच-१ बी व्हिसाच लक्ष्य
तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना हा व्हिसा दिला होता. अमेरिकेत व्यवसाय करणाऱ्या या कंपन्या दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांना पाठवण्यासाठी याच व्हिसावर अवलंबून असतात. लॉटरी पद्धतीने हा व्हिसा मिळतो. म्हणून कंपन्या एका कर्मचाऱ्याच्या नावे अनेक अर्ज दाखल करतात. हा प्रकार आता थांबवला जाईल. बहुतांश कंपन्या कमी वेतनात कर्मचारी मिळावेत म्हणून बाहेर देशांतून कर्मचारी आणतात. त्यामुळे व्हिसाधारकांचे किमान वेतन वाढवण्याचाही एक प्रस्ताव आहे.
औरंगाबादच्या १२५ महिलांच्या नोकरीवर गदा
या निर्णयामुळे एच-४ व्हिसावर अमेरिकेत गेलेल्या महिलांना नोकरी सोडावी लागेल. यात सुमारे ६३ हजार भारतीय महिला आहेत. ‘एक्स्पर्ट ग्लोबल’च्या आकडेवारीनुसार औरंगाबादेतील तब्बल १२५ महिलांच्या नोकरीवर या नवीन नियमामुळे गंडांतर येणार आहे.
सध्या ७१,२८७ परदेशी नागरिक अमेरिकेत नोकरी करतात. यापैकी ९३ टक्के भारतीय तर ४ टक्के चिनी आहेत. यातील महिलांचा विचार करता त्यांची नोकरी धोक्यात आहे.
औरंगाबादच्या १२५ महिलांना फटका
भारताला एच-१ बी व्हिसासाठी ६५ हजारांचा कोटा अाहे. यात २० टक्के म्हणजेच सुमारे १३ हजार महाराष्ट्रातील आहेत. पैकी २.५ ते ३ हजार महिला एच-४ व्हिसावर काम करतात. अौरंगाबादेतून २५० ते ३०० नागरिक एच-१ बी व्हिसावर अमेरिकेत नोकरी करत आहेत. यापैकी १०० ते १२५ औरंगाबादकरांच्या पत्नीही एच-४ व्हीसावर नोकरी करतात. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे त्यांच्या नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागणार आहे.
एच-१ बी व्हिसा आणि ट्रम्प
सत्तेत येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने एच-१ बी व्हीसा विरोधी भूमिका घेतली आहे. ११ डिसेंबर २०१६ रोजी ट्रम्प यांनी अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्यांवर एच १- बी व्हिसा घेऊन आलेल्या परदेशी नागरिकांमुळे गदा येऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. तर ३१ जानेवारी २०१७ रोजी एच-१ बी व्हिसावर अमेेरिकेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात ६० हजार डॉलरवरून १,३०,००० डॉलर करण्याचे विधेयक मंजूर केले. द हाय स्कील इंटिग्रीटी अॅण्ड फेअरनेस अॅक्ट-२०१७ नावाच्या या विधेयकामुळे यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्यांना अमेरिका सोडण्याची वेळ आली होती. आता परत एकदा त्यांच्या निर्णयामुळे एच १-बी व्हिसाधारकांमध्ये खळबळ माजली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.