आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारप्रकरणी इस्रायलचे पंतप्रधान कायद्याच्या कचाट्यात; अराजकाची चाहूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरुद्ध पोलिसांनी दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. नेतन्याहू यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप यात असून आर्थिक अपहाराचा आरोपही लावण्यात आला आहे. त्यांना पदावर का ठेवावे, असे आपल्या लेखी आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार नाही, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. १४ महिने ही चौकशी सुरू होती. पोलिस विभागाकडे त्यांच्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे. ६८ वर्षीय नेतन्याहू हे दोन वेळा पंतप्रधानपदावर राहिले आहेत.  


२००९ मध्ये नेतन्याहू प्रथम पंतप्रधानपदी निवडून आले होते. १९९६ पासून ते विविध राजकीय पदांवर आहेत. पोलिस विभागाने म्हटले आहे की, ३ लाख अमेरिकी डॉलर्सची लाच त्यांनी विविध मार्गांनी स्वीकारली आहे.  


भेटवस्तूंच्या माध्यमातून आर्थिक अपहार

बेंजामिन नेतन्याहू यांनी भेटवस्तूंच्या स्वरूपात संपत्ती स्वीकारून आर्थिक अपहार केला. त्या मोबदल्यात त्यांनी लाच देणाऱ्यांना लाभ करवून दिले. दुसरा आरोप पदाच्या गैरवापराचा असून अर्नोन मोझेस या वृत्तपत्र मालकाशी त्यांनी हातमिळवणी केली. स्वत:च्या समर्थनार्थ अर्नोन मोझेस यांच्या ‘येदीआेत अहरोनोत’ वृत्तपत्राचा वापर करून घेतला. अब्जाधीश अर्नोन मिलचानशी असलेल्या घनिष्ठ संबंधांवरदेखील या आरोपपत्राचा कटाक्ष आहे.

 

मी कार्यकाळ पूर्ण करणार 

आपले सरकार स्थिर असून पोलिसांच्या तपासकार्यावर नेतन्याहूंनी टीका केली आहे. मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत. आपण कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी जबाबदार नेता असून जनतेच्या पाठिंब्यानेच पदावर आहे. आगामी निवडणुकीतही मी जनतेचा कौल मिळवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी आपला तपास अहवाल जारी करण्यापूर्वी पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केले. तपास अहवाल सत्य व तर्काच्या विरुद्ध असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी माझ्याविरुद्ध १५ तपास मोहिमा झाल्या. त्यांचा काहीच निष्कर्ष निघाला नाही. या तपासातही काही तथ्य नाही. यापूर्वी ते म्हणाले होते की, मित्रांकडून भेटवस्तू घेणे बेकायदेशीर नाही.

बातम्या आणखी आहेत...