आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामल्लाह- पश्चिम आशियातील तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पॅलेस्टाइनमध्ये दाखल झाले. तेही इस्रायलच्या हवाई दल सुरक्षेच्या ताफ्यासह. त्यांची ही ऐतिहासिक भेट असून पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जाणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांत काही करार झाले असून उभय देशांतील संबंध दृढ झाले आहेत.
इस्रायलच्या एअर फोर्सच्या विशेष विमानाने मोदी अमानमध्ये दाखल झाल्यानंतर थेट रामल्लाह येथे पाेहोचले. जॉर्डनच्या लष्करी हेलिकॉप्टरने त्यांनी रामाल्लाह गाठले. दिवंगत नेते यासेर अराफत यांच्या स्मृतिस्थळाला त्यांनी भेट देऊन आदरांजली अर्पण केली. १९९४ मध्ये अराफत यांना शांततेचे नोबेल मिळाले होते. १९२९ मध्ये कैरो येथे जन्मलेले अराफत पॅलेस्टाइनचे ८ वर्षे राष्ट्राध्यक्ष होते. ११ नोव्हेंबर २००४ राेजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची द्विपक्षीय मुद्द्यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीनंतर उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत चर्चेचा तपशील दिला व दोन्ही देशांतील प्रगाढ संबंधाची वाटचाल मांडली.
अब्बास यांनी केला सर्वोच्च पुरस्कार देऊन मोदींचा गौरव
भारत-पॅलेस्टाइन यांच्यातील संबंधाला दृढ करण्यासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन अब्बास यांच्या हस्ते मोदी यांना ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’ने गौरवण्यात आले. पॅलेस्टाइनमधील हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. समारंभात दोन्ही नेत्यांत सुरुवातीला गळाभेट झाली. याप्रसंगी मोदी म्हणाले, हा भारताच्या गौरवाचा विषय आहे. हे भारत-पॅलेस्टाइन यांच्या मैत्रीचे प्रतिबिंब दर्शवणारा क्षण आहे. या गौरवाबद्दल मोदी यांनी अब्बास यांचे आभार व्यक्त केले.
शांततेसाठी भारत पॅलेस्टाइनच्या बाजूने उभा : अब्बास
मोदी यांच्या सोबत झालेली चर्चा सुफळ आणि रचनात्मक ठरली आहे. भारतीय नेतृत्व शांततेसाठी पॅलेस्टाइनच्या बाजूने आहे. पॅलेस्टाइनने इस्त्रायलसोबतचा प्रश्न सोडवण्यासाठी वाटाघाटीची तयारी यापूर्वीच दर्शवली आहे. परंतु १९६७ मध्ये झालेल्या करारानुसार पूर्व जेरुसलेम ही पॅलेस्टाइनची राजधानी आहे. आम्हाला तेथे स्वातंत्र्य हवे आहे. शांतता प्रक्रियेत भारताची महत्वाची भूमिका आहे, असे अब्बास यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.