आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका इस्रायली गुप्तहेराच्या घड्याळासाठी Mossad ने राबवली 14 वर्षांची मोहिम, वाचा का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल अवीव - 1967 च्या अरब युद्धात इस्रायलने अवघ्या 7 दिवसांमध्ये विजय मिळवला होता. 4 शक्तीशाली अरब देशांच्या विरोधात झालेल्या युद्धामध्ये इस्रायलला विजय मिळवून देण्याचे श्रेय त्यांची गुप्तचर संस्था मोसादला जाते. मोसाद एजंट एली कोहेनने शेजारील राष्ट्र सीरियात राहून 1960 च्या दशकात हेरगिरी केली होती. त्याचवेळी त्याने इस्रायलसाठी सीरिया विरोधात काही महत्वाची गुपिते बाहेर काढली होती. यात इस्रायल विरोधात सीरियाचे गुप्त प्लॅन सुद्धा समाविष्ट होते. अरब देशांना कोहेन मोसाद एजंट असल्याचे कळताच त्याला मृत्यूदंड देण्यात आला. त्याचा मृतदेह एका गुप्त ठिकाणी दफन करण्यात आला होता. त्याच गुप्तहेराचे घड्याळ नुकतेच दुसऱ्या एका मोसाद एजंटने इस्रायलमध्ये आणले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्याचा उल्लेख करून मोसादचे अभिनंदन केले आहे. 

 

2004 मध्ये सुरू झालेल्या मोहिमेला यश

इस्रायली गुप्तहेराचे घड्याळ परत आणण्यासाठीची मोहिम मोसादने 2004 मध्ये सुरू केले होते. यात सर्वप्रथम मोसादला एलीचा मृतदेह शोधून काढणे आवश्यक होते. गेल्या 53 वर्षांत कुणालाच त्याचा मृतदेह कुठे दफन केला याची माहिती नव्हती. एजंसीला त्याचा मृतदेह शोधून घरी आणण्याचे टास्क देण्यात आले होते. हिरो एजंटला सन्मानपूर्वक देशात दफन करणे यामागचा हेतू होता. परंतु, मोसादचे सर्वात मोठे मिशन होते ते त्या एजंटचे गॅजेट आपल्या देशात घेऊन येणे. मोसादने या मिशनसाठी कोट्यवधी डॉलर खर्च केले. सोबतच त्या एका घड्याळासाठी आपल्या इतर एजंट्सचा जीव धोक्यात टाकला. अखेर मोसादच्या टीमला एलीच्या रिस्ट वॉचचा पत्ता लागला. हेच घड्याळ त्या एजंटने सीरियात 5 वर्षे वापरला होता. 


कोण होता एली कोहेन?
इली कोहेन इजिप्तमध्ये जन्मलेला एक ज्यू होता. 1957 मध्ये त्याच्या कुटुंबियांना इस्रायलमध्ये शरण देण्यात आली. 1960 मध्ये त्याने इस्रायलची लष्करी गुप्तचर संस्था जॉइन केली होती. 60 च्या दशकातच त्याला सीरियात मोसादचा गुप्तहेर म्हणून पाठवण्यात आले होते. एली कोहेनला सीरियात जन्मलेला अर्जेंटिनाहून परतलेला धनाढ्य उद्योजक अशी ओळख देण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात कोहेनने अगदी चलाखीने सीरियाच्या वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी मैत्री केली. आपल्या घरात आलीशान पार्ट्यांमध्ये त्यांना बोलावण्यास सुरुवात केली. या पार्ट्यांमध्ये तो महागड्या दारू आणि ललनांचा वापर करून अधिकाऱ्यांना त्याची सवय लावली. याच माध्यमातून त्याने लष्करी आणि संरक्षण अधिकाऱ्यांकडून महत्वाची माहिती मिळवली. सीरियाचे कोणते वेपन आणि सैन्य तुकडी कुठे तैनात आहे, तसेच इस्रायल विरोधात त्यांचे काय प्लॅन आहेत याची माहिती घेतली. ती सगळीच माहिती त्याने वेळोवेळी मोसादला पाठवली. सीरियन अधिकारी आणि सीरियाच्या राजकारणात त्याचे वजन इतके वाढले, की त्याचे नाव उप-संरक्षण मंत्री पदासाठी सुद्धा विचाराधीन होते असे सांगितले जाते. 


घड्याळाला इतके महत्व का?
एका घड्याळासाठी मोसादने 14 वर्षांची मोहिम राबवल्याने त्यात नेमके काय होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एली कोहेन सीरियात असताना आणि अगदी फासावर लटकेपर्यंत त्याच्या हातात हे घड्चाळ होते. घड्याळ कुठून मिळाले हे जाहीर करण्यात आले नाही. इस्रायली मीडियाच्या वृत्तानुसार घड्याळ देशात पोहोचताच मोसादने त्याचा सविस्तर तपास केला असे म्हटले आहे. परंतु, त्यामध्ये नेमके काय होते हे सांगण्यात आलेले नाही. हे घड्याळ यापूर्वीच इस्रायलमध्ये पोहोचले. ते पोहोचल्याची घोषणा मात्र शुक्रवारी पंतप्रधानांनी केली. ते सध्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना यावर विचारले असता त्या घड्याळाला भावनिक महत्व आहे असे ते सांगतात. सोबतच, ते इतके वर्ष दुसऱ्या देशात असल्याने त्याच्यासोबत काही छेडछाड करण्यात आली आहे का, याचा तपास करण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 


भरचौकात दिली होती फाशी
सीरियावर अतिशय मजबूत जम बसवलेला एली कोहेन उत्तरोत्तर अधिक कॉन्फिडेंट झाला होता. आपल्याला कुणीच पकडू शकत नाही असा गैरसमज त्याला झाला होता. त्यामुळे, तो इस्रायल आणि मोसादशी संवाद साधताना सोप्या आणि सहज माध्यमांचा वापर करायला लागला. हीच चूक एली कोहेनला भोवली. त्याचे रेडिओ सिग्नल लीक झाले आणि तो मोसादचा एजंट असल्याचे समोर आले. 1964 मध्ये सीरियाच्या लष्करी कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. इस्रायलने ही शिक्षा रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. परंतु, आंतरराष्ट्रीय समूहाकडून त्याला सहकार्य मिळाले नाही. 1965 मध्ये एली कोहेनला सीरियाच्या राजधानीत भर चौकात फासावर लटकवण्यात आले. त्याचा मृतदेह इस्रायलला पाठवल्यास त्याला नायकाचा दर्जा मिळेल याची जाणीव सीरियाला होती. त्यामुळे, त्याचा मृतदेह एका गुप्त ठिकाणी दफन करण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...