आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी-जिनपिंग भेट: अनौपचारिक शिखर बैठकीत मैत्रीचे पाऊल! वादग्रस्त मुद्द्यांवर सहमतीसाठी प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वुहान- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात शुक्रवारपासून दोन दिवसीय अनौपचारिक शिखर बैठक सुरू झाली. कोणत्याही अजेंड्याविना व संयुक्त वक्तव्याविना होत असलेली ही बैठक दोन्ही देशांत मैत्रीचा धागा जोडणारी असल्याचे दोन्ही नेते म्हणाले. पहिल्याच दिवशी जिनपिंग-मोदी तीन वेळा भेटले. या वेळी मोदी म्हणाले, जगात शांतता, स्थैर्य प्रस्थापित करून समृद्धी आणण्याच्या दृष्टीने भारत-चीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिष्टमंडळाशी चर्चा करताना मोदी जिनपिंग यांना म्हणाले की, दोन्ही देशांत जगातील ४० टक्के लोकसंख्या राहते. त्यामुळे दोन्ही देश मिळून जगाच्या अनेक अडचणी सोडवू शकतील. विशेषत: जागतिक शांततेच्या दृष्टीने दोन्ही देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 


गेल्या दोन हजार वर्षांपासून भारत व चीन या देशांनी एकत्रितपणे जागतिक अर्थव्यवस्थेला गती दिली आहे. सुमारे १६०० वर्षे याच देशांचे वर्चस्व राहिल्याचा इतिहास आहे, असे मोदी म्हणाले. अनौपचारिक चर्चेची मालिका सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करून मोदींनी जिनपिंग यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले. 


जिनपिंग म्हणाले, अशात या दोन्ही देशांत सहकार्याच्या दृष्टीने चांगली प्रगती झाली आहे. गेल्या पाच वर्षांत बरेच काही लाभही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत-चीनमधील २६० कोटी लोकसंख्या विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारी आहे. आशियातील या भागात दोन्ही देशांचा प्रभाव वाढत चालला असल्याचेही जिनपिंग यांनी नमूद केले. 


वादग्रस्त मुद्द्यांवर सहमतीसाठी प्रयत्न 
भारत-चीन सीमेवरील तणावाचे अशात घडलेले प्रसंग पाहता मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. डोकलाम वादानंतर होत असलेली ही भेट दोन्ही देशांत नव्याने परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करणारी असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. या चर्चेत भलेही कोणते करार किंवा संयुक्त निवेदन दिले जाणार नाही, परंतु दोन्ही देशांची मने जोडणारी ही बैठक असेल, असे सूत्रांनी सांगितले. 


डोकलामचा मुद्दा मांडा : राहुल गांधी 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केली. आज डोकलाम वादासह व्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या चीन-पाकच्या आर्थिक कॉरिडॉरबद्दल मोदी चीनशी चर्चा करताना देशाला पहावयाचे आहे. असे ट्विट राहुल यांनी केले. 

 

संबंध सुधारू शकतील : लष्कर 
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने मोदी-जिनपिंग अनौपचारिक शिखर बैठकीतून दोन्ही देशांतील संबंधांच्या दृष्टीने स्थैर्य येऊ शकेल तसेच सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यात मदतीची ठरू शकेल, अशी आशा व्यक्त केली आहे. 


चार वर्षांत चौथ्यांदा मोदी चीनमध्ये 
- पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा चौथा चीन दौरा. जूनमध्येही ते चीनला जाण्याची शक्यता आहे. 
- मोदी-जिनपिंग यांची ११व्या वेळा भेट. यापूर्वी बराक ओबामा यांच्याशी मोदी आठ वेळा भेटले. 
- राष्ट्रपती जिनपिंग यांनी प्रोटोकॉल तोडून भेट घ्यावी, असे मोदी पहिले पंतप्रधान आहेत. 


शुक्रवारी तीन वेळा भेटले माेदी-जिनपिंग 
१. हुबेई संग्रहालयात जिनपिंग यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात मोदींचे स्वागत केले. येथील जेंग संस्कृतीशी संबंधित वस्तू जिनपिंग यांनी दाखवल्या. 
२. दोन्ही नेत्यांत प्रतिनिधीमंडळासह चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह दोन्ही देशांचे प्रत्येकी सहा वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित हाेते. 
३. वुहानच्या प्रसिद्ध ईस्ट लेकजवळ असलेल्या विश्रामगृहात दोन्ही नेत्यांनी रात्री भोजन घेतले. या वेळी जागतिक, विभागीय व द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. 


आज पुन्हा तीन वेळा होणार भेट... 
१. सकाळी दोन्ही नेते ईस्ट लेकच्या किनाऱ्यावर चर्चा करतील. 
२. मोदी व जिनपिंग नावेत सफर करत विविध मुद्द्यांवर चर्चा करणार. 
३. दुपारचे भोजन दोन्हे नेते सोबत घेतील. 

बातम्या आणखी आहेत...