आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/अहमदाबाद- पाकिस्तानने भारतात आपले राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या नातेवाइकांना त्रास दिला जाण्याच्या आणि त्यांना धमकावले जात असल्याच्या आरोपांनंतर नवी दिल्लीतील आपले उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांना सल्लामसलतीसाठी मायदेशी बोलावले आहे.
दुसरीकडे, माध्यमांत आलेले वृत्त फेटाळून लावताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीशकुमार म्हणाले की, ‘राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशात बोलावणे आणि चर्चा केली जाणे ही सामान्य बाब आहे. त्यावरून काही प्रश्न उपस्थित का केले जात आहेत असा प्रश्न मला पडला आहे. यात उच्चायुक्तांना माघारी बोलावण्यासारखे काहीही नाही.’ कुमार म्हणाले की, पाकिस्तानने जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांची उत्तरे आम्ही कूटनीतिक माध्यमांतून देतच आहोत. पाकिस्तानमधील आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा छळ होत आहे. त्यांच्या सुरक्षेबद्दल आम्ही पाकिस्तानशी चर्चा केली आहे.
पाकिस्तानचे आरोप असे
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मुहम्मद फैसल यांनी गुरुवारी आपल्या आरोपांचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, आम्ही नवी दिल्लीतील आमचे उच्चायुक्त सोहैल यांना सल्लामसलत करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. फैसल म्हणाले की, ‘भारताचे गुप्तचर अधिकारी पाकिस्तानचे उच्चायुक्त आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देत आहेत आणि हा त्रास रोखण्यात भारत सरकारला अपयश आले आहे.’ माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने मंगळवारी भारतीय अधिकाऱ्यांना एक व्हिडिओ सोपवला आहे. त्यात नवी दिल्लीतील वसंत विहार भागात पाकिस्तानच्या उच्चायुक्तांच्या कारला दुसरी कार आणि स्कूटर यांच्याद्वारे रस्त्यात रोखले जाण्याचा प्रयत्न होत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
काश्मीरवर भारताने पाकला दिले उत्तर
संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानच्या दूतावासाचे सेकंड सेक्रेटरी काझी सलीम अहमद खान यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. जिनेव्हातील भारताचे सल्लागार सुमित सेठ यांनी त्याला उत्तर दिले. सेठ म्हणाले की, पाकिस्तानमध्ये अपहरणासारख्या गुन्ह्यांना कुठलीही शिक्षा दिली जात नाही. विशेषत: बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि सिंधमध्ये लोकांचे अपहरण केले जात आहे किंवा त्यांची हत्या केली जात आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या महिलांचे आणि मुलींचे अपहरण करून त्यांचा जबरदस्तीने विवाह लावला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.