आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यासारख्या श्रीमंतांनी जास्त कर द्यायला हवा; 64 हजार कोटींचा कर भरणारे बिल गेट्स यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- माझ्यासारख्या दुसऱ्या अति श्रीमंत व्यक्तींनी इतरांपेक्षा जास्त कर भरायला हवा. ज्या व्यक्ती जास्त कर भरतात त्यांच्याकडे सरकारनेही जास्त लक्ष द्यायला हवे, असे मत जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती तसेच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केले.  गेट्स यांचे नेटवर्थ ५.७९ लाख कोटी रुपयांचे आहे. मागील वर्षी त्यांनी सुमारे ६४ हजार कोटी रुपयांचा कर भरला, जो कोणत्याही व्यक्तीच्या तुलनेत सर्वाधिक आहे.  


अलीकडेच अमेरिकी सरकारने नवीन कर कायदा लागू केला आहे. यामध्ये कंपनीकरिता सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये गेट्स यांनी व्यक्त केलेल्या या मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अॅमेझॉनचे जेफ बेजो यांच्यानंतर गेट्स जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 


बेजो यांचे नेटवर्थ ५.८२ लाख कोटी रुपयांचे आहे. नवीन कर सुधारणा प्रोग्रेसिव्ह (उत्पन्न वाढीबरोबर कर दरात वाढ) नाही, तर रिग्रेसिव्ह (जास्त उत्पन्नावर कमी कर) आहे. नवीन नियमातकरण्यात आलेल्या कर कपातीचा फायदा मध्यमवर्गाच्या लोकांना मिळायला हवा होता. मात्र, याचा सर्वाधिक फायदा अति श्रीमंतांनाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.गरीब आणि मध्यमवर्गातील लोकांच्या तुलनेत समृद्ध लोकांना आश्चर्यकारकरीत्या सर्वाधिक फायदा मिळणार असल्याचे गेट्स यांनी सांगितले. 


श्रीमंत जास्त कर देत असल्याची धारणा निर्माण झाली आहे. वास्तविक परिस्थिती त्याच्या उलटी आहे. सर्व समृद्ध लोकशाही राष्ट्रांनी या विषयावर गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. 


लोकसंख्येचा सहावा भाग अतिशय चिंताजनक परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. याची आपल्यालाही चिंता वाटायला हवी. सरकारला धोरणावर पुन्हा विचार करावा लागेल. आपण त्या लोकांसाठी चांगले काम का करू शकत नाहीत? गेट्स यांनी त्यांच्या संपत्तीतील २.५ लाख कोटी रुपये परोपकारासाठी दान केले आहेत. यात मलेरिया तसेच पोलिओला नष्ट करण्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेत पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्याचे अभियान प्रमुख आहे. 


गेट्स यांच्याआधी ४०० अमेरिकी श्रीमंतांनी दिला होता प्रस्ताव 
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सुमारे ४०० कोट्यधीश आणि अब्जाधीशांनी अमेरिकी संसदेला दिलेल्या प्रस्तावाप्रमाणेच गेट्स यांनी दिलेल्या प्रस्तावाचे स्वरूप आहे. कर कपातीमुळे महसुलात घट होऊन त्याचा परिणाम शिक्षण आणि आरोग्यासारख्या सेवांवर होईल, त्यामुळे कर कपात करू नये, असे त्या सर्वांनी लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले होते. यामुळे देशावरील कर्जाचे ओझे वाढून लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी होईल. जास्त सवलत दिल्याने असमानतेलाही प्रोत्साहन मिळेल. हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये जॉर्ज सोरोस, स्टीव्हन रॉकफेलर, जॅरी ग्रीनफील्ड आणि बेन अँड जॅरी आइस्क्रीमचे संस्थापक बेन कोहेनसारख्या दिग्गजांबरोबरच अनेक डॉक्टर, वकील आणि सीईओंचा समावेश होता.  

बातम्या आणखी आहेत...