आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला होताच शिक्षिकेने वर्गातील खिडकीचे पडदे लावले कमांडो आले तरी दरवाजा नाही उघडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडा- मागील आठवड्यात फ्लोरिडातील एका शाळेत हल्ला झाला होता. यात १७ मुलांचे प्राण गेले. भारतीय मूळ असलेल्या शांती विश्वनाथन यांनी प्रसंगावधान राखले नसते तर हल्ल्याची तीव्रता आणखी जास्त राहिली असती. बुधवारी शांती नेहमीप्रमाणे वर्ग घेत होत्या. अचानक शाळेतील फायर अलार्म वाजला. वर्गातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यापूर्वीच दुसऱ्यांदा अलार्म वाजला. शाळेत आग लागली नसून दुसराच काहीतरी प्रकार आहे, अशी शंका त्यांना आली. मुलांना वर्गाबाहेर निघण्यास त्यांनी मनाई केली. त्यांची शंका खरी ठरली. जास्तीत जास्त जणांना लक्ष्य करावे म्हणून हल्लेखोरानेच तो अलार्म वाजवला होता. 


फ्लोरिडात हायस्कूलमध्ये शांती गणित विषयाच्या शिक्षिका आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांनी मुलांना फरशीवर झोपण्यास सांगितले. खिडकीच्या बाहेरून वर्ग बंद असल्याचे भासावे म्हणून त्यांनी तत्काळ वर्गातील सर्व पडदे लावले. वर्गातील एका खिडकीला त्यांनी वृत्तपत्रांच्या रद्दीने झाकून टाकले. सर्व वर्गांची तपासणी करताना कमांडो शांती यांच्या वर्गापर्यंत पोहोचले होते. त्यांनी दरवाजा वाजवला. परंतु शांती यांनी दरवाजा उघडला नाही. कमांडो असाल तर दरवाजा तोडून आत या किंवा क्लासरूमची चावी आणून दरवाजा उघडा, असे स्पष्टपणे सांगितले. शेवटी कमांडोंनी चावी आणून दरवाजा उघडला आणि शांती यांच्यासह विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. शांती यांनी दाखवलेले शौर्य एका विद्यार्थ्याची आई डाॅन जर्बो व शाळा व्यवस्थापनाने फ्लोरिडातील स्थानिक माध्यमाला सांगितले. फ्लोरिडातील लोकांनी शांती यांना ‘ब्रेव्ह लेडी’ असे नाव दिले आहे. फ्लोरिडातील भारतीय मूळ असलेल्या लोकांची संख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. यात २० हजारांहून अधिक लोक ब्रोवार्ड काउंटीमध्ये राहतात. याच ठिकाणी हल्ला झालेली शाळा आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणीही भारतीय मूळ असलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...