आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी वस्तूंवर 100% आयात शुल्क लावणाऱ्या देशांवर ट्रम्प यांची आगपाखड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन / क्युबेक - कॅनडाच्या क्युबेक शहरात जी-७ देशांच्या परिषदेदरम्यान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक मित्रराष्ट्रांच्या व्यापार धोरणावर कडक टीका केली. अमेरिकेची लूट करणारे त्यांचे आयात धोरण असून नवी दिल्ली प्रशासनही यास अपवाद नसल्याचे ट्रम्प म्हणाले.

 

अनेक अमेरिकी बनावटीच्या वस्तूंवर भारतात १००% आयात शुल्क असणे, याला मैत्री म्हणावे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. व्यापार करार रद्द करण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जी-७ देशांच्या परिषदेचा फार्स झाल्याची स्थिती आहे. कोणत्याही सहमती करारावर स्वाक्षरी करणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. शिवाय परिषदेचे यजमान व कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन ट्रुडो यांच्यावर कडवट टीका केली.

 

बहुतांश निर्यातदार अमेरिकेवर नाराज का?  
अमेरिकेला निर्यात करणारे बहुतांश व्यापारी मित्र सध्या ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराज आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे पोलाद आयातीवर अमेरिकेने २५%, तर अॅल्युमिनियम आयातीवर १५% आयात शुल्क लावले आहे. भारताने अमेरिकी वस्तूंना करमुक्त करावे, असा प्रस्ताव अमेरिकेने दिला आहे. चीन, मेक्सिको, कॅनडा, युरोपीय देश प्रामुख्याने ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाच्या रडारवर आहेत. त्या तुलनेत भारताविषयीचे धोरण सध्या तरी मवाळ आहे.


अमेरिकेला 'पिगी बँक' समजू नका
या वेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, सर्व मित्र म्हणवणाऱ्या राष्ट्रांनी अमेरिकेला पिगी बँक समजले आहे. वाट्टेल तेव्हा यातून पैसा काढला जातो. जी-७ नंतर झालेल्या पत्रपरिषदेत त्यांनी आपले मत मांडले. माझा आक्षेप केवळ विकसित देशांच्या व्यापार धोरणावर नाही. भारतासारखे विकसनशील देशही हेच करत आहेत. जी-७ मधील सदस्य देशच नव्हे, तर अनेक देशांशी अमेरिका व्यापारविषयक नव्याने बोलणी करणार आहे. अमेरिकी वस्तूंवर जबर आयात शुल्क लादून हे देश आपल्या वस्तूंसाठी मात्र करमुक्त बाजारपेठ अमेरिकेत शोधत आहेत.

 

भारतासोबत ११ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यापार
ट्रम्प यांनी व्यापार धोरण बदलण्याची धमकी दिली असून भारत-अमेरिका व्यापार सध्या भरभराटीला आहे. याचे भवितव्य आता पुन्हा अधांतरी झाले आहे. गेल्यावर्षी उभय देशांत ११ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यापार झाला होता. आगामी काळात १२५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत हा व्यापार जाण्याची शक्यता वर्तवली असताना हे वक्तव्य आले आहे. 'अमेरिका फर्स्ट' हा ट्रम्प यांचा अजेंडा असून आयात शुल्क पूर्णत: रद्द करणे हे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुक्त व्यापाराचे समर्थन करणाऱ्यांना दुतर्फी आयात शुल्क बंदी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात चीन-अमेरिकेदरम्यानही व्यापारविषयक बोलणी झाली होती. अमेेरिकी वस्तू आयातीत चीन लक्षणीय वाढ करेल यावर बीजिंग प्रशासनाला सहमती देणे अमेरिकेने भाग पाडले होते.

 

हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवर भारतात जबर कर का?
या वेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलची चांगली मागणी भारतीय बाजारात आहे. मात्र, त्यावर जबर आयात शुल्क भारताने लादले आहे. भारतीय बनावटीच्या दुचाकींवर मात्र अमेरिकेत आयात शुल्क नाही. हे यापुढे चालणार नाही. अशा सर्वच देशांशी अमेरिका व्यापार बंद करेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. कॅनडातून निघण्यापूर्वीच त्यांनी हा इशारा दिला व उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी होणारी चर्चा यशस्वी होणारच, असेही ते पत्रपरिषदेत म्हणाले.

 

राष्ट्राध्यक्षांचा ट्विटरवरूनही टीकास्त्रांचा वर्षाव सुरूच
सोमवारी ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही मित्रराष्ट्रांच्या व्यापार धोरणावर तीव्र टीका केली. 'जी-७ देश ज्याला 'फेअर ट्रेड' म्हणत आहेत, ते 'फुल ट्रेड' आहे. हे दुतर्फी नाही.' कॅनडाच्या आयात धोरणाचा समाचार ट्रम्प यांनी घेतला. अमेरिकेच्या नागरिकांशी आपण प्रतारणा करू शकत नाही. यामुळे अमेरिकेला व्यापारी तूट सोसावी लागत आहे, असे ट्रम्प म्हणाले. नाटोचा आर्थिक भारही सर्व सदस्यांनी समान स्वीकारावा, असे ट्रम्प म्हणाले. जर्मनीचे नाटोमधील योगदान नगण्य असल्याचे ट्रम्प म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...