आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेला लष्करी, हेरगिरीसाठी मदत देणार नाही; पाकची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद / वॉशिंग्टन- पाकिस्तान यापुढे अमेरिकेला लष्करी आणि हेरगिरीसंबंधीची मदत देणार नाही ,अशी घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मंजूर केलेली लष्करी मदत रोखण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर पाकने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 


पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांना थारा दिला जात असल्याचा अमेरिकेचा आरोप असून आता पाकची भूमीच अमेरिकेला न मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  दरम्यान, अमेरिकी सैन्याचा पाकमधील लष्करी, हवाई स्थानकांवरचा राबता रोखण्यात आला नाही. संरक्षण स्तरावर मैत्री ठेवणार नसल्याचे दस्तगीर यांनी इस्लामाबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज येथे बोलताना म्हटले. ‘काँटर्स ऑफ सिक्युरिटी एन्व्हॉयर्नमेंट ऑफ पाकिस्तान’ या विषयावर खान बोलत होते. 

 

पाकिस्तान बळीचा बकरा ठरला 

इस्लामाबादेत बोलताना संरक्षणमंत्री खान म्हणाले की, अमेरिकेने पाकला केवळ ‘बळीचा बकरा’ बनवले आहे. अफगाणिस्तान रणनीतीमध्येदेखील पाकची हीच स्थिती केली आहे.  दहशतवादाविरुद्ध पाकने केलेल्या प्रयत्नांचा मोबदला पाक मागत नाही. मात्र, त्या बलिदानाची दखलही घेऊ नये हे धक्कादायक असल्याचे मत त्यांनी मांडले. दरम्यान, इस्लामाबादेतील अमेरिकी दूतावासाच्या सूत्रांनी सांगितले की, लष्करी व हेरगिरी सहकार्य रद्द करण्याचा निर्णय सरकारने कळवलेला नाही. यासंबंधी आैपचारिक पत्र न मिळाल्याचे वकिलातीचे प्रवक्ते रिचर्ड स्नेलसिरे यांनी सांगितले.  

 

अमेरिका पाकविषयी आशावादी

वॉशिंग्टन प्रशासनाची पाकच्या निर्णयावर प्रतिक्रिया मागितली असता, परराष्ट्र उपसचिव स्टीव्ह गोल्डस्टेन यांनी सांगितले की, भविष्यातही पाकिस्तान अमेरिकेला लष्करी सहकार्य देईल, अशी आशा आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हे सहकार्य मिळत राहील. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कविरुद्ध पाक सरकार कठोर कारवाई करेल, असा विश्वास अमेरिकेला आहे. त्यानंतर उभय देशांतील संबंध दृढ होतील, असे स्टीव्ह गोल्डस्टेन म्हणाले. प्रत्यक्ष चर्चेतून उभय देशांतील तणाव कमी होईल. अमेरिकेने पाकला देऊ केलेली लष्करी मदत अल्पावधीसाठी रद्द केली आहे. याचा अर्थ संरक्षण करार संपुष्टात आला असे नव्हे, असे गोल्डस्टेन यांनी स्पष्ट केले.  

 

२०१७ मध्ये भारतीय लष्कराद्वारे १३८ पाक सैनिकांचा खात्मा  

वर्ष २०१७ मध्ये झालेल्या उभय देशांतील संघर्षात १३८ पाक सैनिकांचा खात्मा भारतीय लष्कराने केला. विविध मोहिमा, सीमेवर झालेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि नियंत्रण रेषवर पाक सैनिक भारतीय लष्कराद्वारे ठार करण्यात आले, असे हेर संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. या काळात भारताने आपले २८ जवान गमावले. पाकिस्तान आपल्या बळी गेलेल्या सैनिकांची यादी कधीच जाहीर करत नाही, असेही यात नमूद केले आहे. नागरिकच बळी गेल्याचा दावा पाकिस्तान करत असतो. भारतीय लष्कराने शस्त्रसंधीच्या घटना या वर्षात गांभीर्याने हाताळल्या. त्यामुळे पाकच्या  १३८ सैनिकांचा खात्मा झाला आणि १५५ इतर पाक नागरिक बळी गेले.

बातम्या आणखी आहेत...