आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येमेनची उपासमार थांबवण्यासाठी सौदीकडून 2 अब्ज डॉलर्सचा निधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध- देशाची अर्थव्यवस्था कोलमडून जनता उपासमारीच्या खाईत लोटली जाण्यापूर्वी आर्थिक मदत द्यावी, असे साकडे गृहयुद्धात होरपळणाऱ्या येमेनने सौदी अरेबियाकडे घातले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सौदीचे राजे सलमान यांनी २ अब्ज डॉलर्सची मदत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.  


२ अब्ज डॉलर्सचा निधी येमेनच्या सेंट्रल बँकेत जमा केला जाणार आहे. सध्या येमेनमधील जनतेसमोर अतिशय मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सौदी आणि आंतरराष्ट्रीय आघाडीचा पाठिंबा असलेल्या येमेन सरकारने एका पर्यायी बँकेची स्थापना केली आहे. त्यात हा निधी पाठवण्यात येणार आहे.  पंतप्रधान अहमद आेबीड बिन डाघर यांनी मंगळवारी ही विनंती केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी सौदीने सकारात्मक प्रतिसाद दिला. देशातील परिस्थिती सावरण्यासाठी सौदीसह आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करण्याची विनंतीही त्यांनी केली होती. तत्पूर्वी नोव्हेंबरमध्ये अब्दु-रब्बू मन्सूर हादी यांनी उपासमार रोखण्यासाठी सौदी अरेबिया २ अब्ज डॉलर्सची मदत देणार असल्याचा दावा केला होता.  


दरम्यान, तीन वर्षांपूर्वी येमेनमध्ये गृहयुद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हा येमेनच्या सरकारने बंडखोरांच्या विरोधात हवाई हल्ले केले होते. हौथी बंडखोरांना ठार करण्यासाठी आक्रमक व्यूहरचना राबवण्यात आली होती. परंतु अद्यापही येमेनमध्ये शांतता निर्माण होऊ शकलेली नाही. 

 

रियाल कोसळला  
येमेनचे चलन रियालचे अवमूल्यन झाले आहे. बुधवारी अनेक उद्योगांनी देशातील कारखान्यांना टाळे लावले आहे. सध्या एक डॉलर अर्थात ५०० रियाल अशी अवस्था झाली आहे. ऑगस्टमध्ये एक डॉलरच्या तुलनेत रियालचे मूल्य ३३५ असे होते. युद्धापूर्वी अर्थात २०१४ मध्ये एक डाॅलरचे मूल्य २१५ रियाल एवढे होते.   

 

३० लाखांचे स्थलांतर  
संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार तीन वर्षांत येमेनमध्ये १० हजारांवर लोकांना प्राण गमावावे लागले. आघाडीच्या फौजांनी केलेल्या कारवाईमुळे सुमारे ३० लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यानंतर देशात साथीच्या रोगाने थैमान घातले. त्यात  २ हजारांवर लोक दगावले. आजारपणासह हिंसाचारात ५ हजारांवर मुले दगावली.  

 

 

कुपोषण, आजारांत वाढ  
युद्धादरम्यान तीन वर्षांत ३० लाख मुलांचा जन्म झाला आहे. येमेनमधील परिस्थिती अत्यंत विदारक आहे. सुमारे १ कोटी १० लाख मुलांपैकी सरासरी प्रत्येक मुलाला मानवी मदतीची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. कारण मुलांमध्ये कुपोषण आणि आजार वाढीस लागले आहेत, अशी चिंता संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली. 

 

हौथींना दडपण्याचे प्रयत्न,  उंबरठ्यावर उपासमारी  

 

येमेनच्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असतील तर माझी तयारी असल्याचे डाघर यांनी म्हटले आहे. परंतु गृहयुद्ध थांबलेले नाही. २०१५ मध्ये सौदी-अरब लष्कराने शिया हाैथी बंडखोरांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ले केले. त्यानंतर देशात हिंसाचार आणि अराजक पसरले. हौथी बंडखोरांचे येमेनच्या बहुतांश भागावर वर्चस्व होते.

बातम्या आणखी आहेत...