आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिसमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील धोरणांविरोधात आंदोलन पेटले, 300 आंदोलक ताब्‍यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- जागतिक कामगार दिनानिमित्त मध्य पॅरिसमध्ये १२०० तरुणांनी तीव्र आंदोलन केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या सार्वजनिक क्षेत्रांतील सुधारणा धोरणाला विरोध करण्यासाठी काळ्या जॅकेटमध्ये १२०० आंदोलक रस्त्यावर उतरले. यांच्या चेहऱ्यावर मास्क लावले होते.

 

‘राइज अप पॅरिस’; ‘आम्ही पोलिसांचा तिरस्कार करतो’ या दोन घोषणांनी मध्य पॅरिस दुमदुमले होते. येथील मॅकडॉनल्ड रेस्तराँला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. अनेक वाहनेदेखील पेटवण्यात आली. यानंतर ३०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. १ मे हा दिवस कामगार हक्कांचा दिवस म्हणून फ्रान्समध्ये सर्वत्र साजरा झाला. मध्य पॅरिसमध्ये मात्र सरकारच्या धोरणांविरुद्ध उद्रेकाचे दृश्य होते.  


पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर येथे जाळपोळीच्या घटना वाढल्या. ऑस्टरलिट््झ स्टेशनजवळील मॅकडॉनल्ड रेस्तराँ पेटवण्यात आले. या परिसरातील कार विक्री दालन पेटवल्याने धुराचे लोटच्या लोट दिसून आले.  


मॅक्रोन यांच्या कारकीर्दीतील सर्वात उग्र आंदोलन  : मॅक्रोन यांचे सार्वजनिक क्षेत्रातील सुधारणा धोरण सामान्य माणसाच्या हिताचे नाही. मोठ्या उद्योजकांसाठीच ते फायद्याचे आहे, असा आरोप डावी संघटना ‘ब्लॅक ब्लॉक’च्या आंदोलनकांनी केला. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर व पाण्याचा वापर केला.

 

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी या तोडफोडीचा निषेध केला. सध्या ते ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून ट्विटरद्वारे त्यांनी आपले मत व्यक्त केले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. १९ वर्षीय आंदोलकाने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मॅक्रॉन यांची धोरणे स्वीकार करणार नाही.

 

५५ हजार नागरिकांचे शांततेत आंदोलन
मॅक्रोन सरकारच्या धोरणाविरुद्ध पॅरिसमध्ये ५५,००० नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मात्र, मध्य पॅरिसमधील हिंसक आंदोलनामुळे मे डेला गालबोट लागल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. १ लाख ४३ हजार नागरिकांनी कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन केले. कामगार व विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...