आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरुसलेमचा निर्णय मागे घेण्‍यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर अरब लीगचा दबाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 कैरो- जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी राहील, हा निर्णय मागे घेण्याची मागणी करून अरब देशांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव वाढवला आहे. ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा करून याच महिन्यात जॉर्डनमध्ये अरब लीगची आणीबाणीची बैठक बोलावण्यात आली आहे.  बैठकीत २२ प्रतिनिधींची उपस्थिती होती. 


रविवारी अरब राष्ट्रांतील परराष्ट्रमंत्री स्तरावरील बैठकीत अमेरिकेच्या एकतर्फी घोषणेवर चिंता व्यक्त करण्यात आली. आता ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाने निषेध करणारा ठराव घेतला पाहिजे. त्यात अमेरिकेने विशेषाधिकाराचा वापर केल्यास अरब लीग आमसभेत अशाच प्रकारचा ठराव आणेल, अशी माहिती पॅलेस्टाइनचे परराष्ट्रमंत्री रियाद अल-मलिकी यांनी कैरो येथील रविवारी पहाटे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी सायंकाळपासून ही बैठक सुरू होती. गेल्या ५० वर्षांपासून जेरुसलेमवर अतिक्रमण आहे. आता त्याविरोधात संघर्ष आणखी वाढला आहे, असा इशारा त्यांनी दिला. मंत्र्यांची दुसरी बैठक एकाच महिन्यात जॉर्डनमध्ये घेतली जाईल, असे सांगण्यात आले. ६ डिसेंबर रोजी ट्रम्प यांनी जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असल्याचा वादग्रस्त एकतर्फी निर्णय जाहीर केला. त्यानंतर अमेरिकेचे राजदूत कार्यालय तेल अवीवमधून जेरुसलेममध्ये हलवण्यात येत असल्याचे कळवण्यात आले होते.  

 

२००२ अरब शांतता करार  
२००२ मधील अरब शांतता कराराशी अरब लीग कटिबद्ध आहे. परंतु १९६७ च्या मध्यपूर्वेतील युद्धात इस्रायलने काही भाग बळकावला होता. तो हस्तांतरित करण्याचे करारात नमूद आहे. असे असताना ट्रम्प यांनी मध्येच निर्णय घेऊन पक्षपाती भूमिका मांडणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अरब ठरावाला नाकारणारी आहे, असे मलिकी यांनी सांगितले.  

 

अरब उद्योगांवर बहिष्काराची  इस्रायली संरक्षणमंत्र्यांची इच्छा 
पॅलेस्टाइनसह अरब देशांतून इस्रायल व अमेरिकेच्या विरोधातील संताप वाढत चालला असला तरी इस्रायलने आपली भूमिका साेडलेली नाही. उलट इस्रायलचे संरक्षणमंत्री अविग्डोर लिएबरमन यांनी अरब देशांच्या उद्योगांवर बहिष्कार घातला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील प्रदेशात अरब देशातील उत्पादने वापरू नये. काहीही खरेदी करू नका, असे आवाहन त्यांनी केले.  

 

 

लेबनॉनमध्ये अमेरिकी राजदूत  कार्यालयाजवळ तीव्र निदर्शने  
लेबनॉनमधील अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाजवळ रविवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी शेकडो लोक जमले होते. त्यांना पांगवण्यासाठी लेबनॉन पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.  

 

 

इस्रायलने हमासचे बोगद्यातील अड्डे नष्ट केल्याचा दावा  
गाझापट्ट्यातून शेकडो मीटर इस्रायलच्या दिशेने खोदण्यात आलेल्या बोगद्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उडवून लावण्यात आल्याचे इस्रायलचे लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉन्रीकस यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी सुरक्षा दलास तपासादरम्यान हे बोगदे आढळून आले होते. त्यामुळे त्यांना नष्ट करण्यात आले.   

 

बातम्या आणखी आहेत...