आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणशी व्यवहार ‘शून्य’च असावेत, यात मधला मार्ग नाहीच; अमेरिकेचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- इराणकडून तेल आयातीत कपात करणाऱ्या देशांविषयीचे धोरण अमेरिकेने निश्चित केले आहे. ते आता लवकरच अमलात येईल. मात्र, तेहरानवरील दबाव कमी करणाऱ्या भारत आणि तुर्कीसारख्या देशांना कोणतीही सूट अमेरिका देणार नाही, असा इशारा ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला आहे. इराण भारताचा तिसरा मोठा तेल निर्यातदार देश आहे. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान इराणने भारताला १८.४ दशलक्ष टन तेल निर्यात केले होते.  


दबाव अभियानात तडजोड नाही : इराणकडून तेल आयात १००% बंद करणाऱ्या देशांनाच अमेरिकेत व्यापार सूट मिळेल. तसे न केल्यास अजिबात लवचिकता ठेवली जाणार नाही. कारण तेहरानवरील दबाव त्यामुळे शिथिल होणार आहे. ते अमेरिकेला मान्य नाही. इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठीचे हे दबाव अभियान आहे, असे अमेरिकेचे धोरण विभागाचे संचालक ब्रायन हुक यांनी म्हटले आहे. सोमवारी त्यांनी याविषयी पत्रपरिषद घेतली. सुरक्षेसंबंधी ध्येय गाठण्यासाठी आर्थिक कोंडी हेच तंत्र योग्य असल्याचे अनुभवास आले आहे, असे ब्रायन म्हणाले. अमेरिकेच्या निर्बंधांचा पहिला टप्पा ६ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे.  


इराणवर काय परिणाम होणार?  
- पहिल्या टप्प्यात ऑटोमोटिव्ह क्षेत्राला धक्का बसेल.  
- सोने व इतर धातूंच्या व्यापारामध्ये मंदी येईल.  
- ४ नोव्हेंबरपासून अमलात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निर्बंधांमुळे ऊर्जा क्षेत्र अडचणीत येईल. पेट्रोलियमसंबंधी व्यवहार ठप्प होतील.  
- इराणच्या केंद्रीय बँकेच्या व्यवहारावर विपरीत परिणाम होईल.  


इराणची अणुकरारावर जागतिक महासत्तांशी शुक्रवारी चर्चा  
२०१५ मध्ये झालेल्या इराण अणुकराराविषयी जागतिक महासत्तांशी चर्चा करणार असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे. येत्या शुक्रवारी या चर्चेचे आयोजन व्हिएन्ना येथे करण्यात आले आहे. ब्रिटन, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि रशियातील उच्चस्तरीय प्रतिनिधी या चर्चेत सहभागी होतील. इराणच्या वतीने परराष्ट्रमंत्री मुहंमद जावाद झारीफ ऑस्ट्रियाला जाणार आहेत. अमेरिकेने या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही पहिली उच्चस्तरीय चर्चा आहे. युरोपीय महासंघ शुक्रवारी काही प्रस्ताव इराणसमोर ठेवण्याची शक्यता आहे. रुहानी सध्या युरोप दौऱ्यावर अाहेत.  


होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील  एक तृतीयांश तेलाची निर्यात होते  
रुहानी यांनी  मंगळवारी स्वित्झर्लंडमध्ये अमेरिकेच्या निर्बंधांविषयी चिंता व्यक्त केली. यापूर्वी जेव्हा इराणची कोंडी अमेरिकेने केली होती त्या वेळी होर्मुझची सामुद्रधुनी इराणने जलवाहतुकीसाठी बंद केली होती. आंतरराष्ट्रीय व्यापारात ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. जगात याच मार्गाने एक तृतीयांश तेल निर्यात होते. तेल निर्यातदार देशांच्या आेपेक संघटनेतील इराण हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा निर्यातदार देश आहे. एका दिवसात इराणमधून २ दशलक्ष बॅरल तेल निर्यात होते.


आयातदार देशांचा दौरा केला : ट्रम्प
प्रशासनाने ‘इराण दबाव अभियानाच्या ’ संकल्पनेविषयी चर्चा करण्यासाठी प्रत्येक देशात आपले प्रतिनिधी पाठवून प्रत्यक्ष चर्चा केली आहे. जगातील बहुतांश देशांत महिनाभर भेटींचे सत्र सुरू होते. अमेरिकेच्या या दहशतवादविरोधी अभियानाला अनेक देशांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करणे हाच याचा हेेतू असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. ४ नोव्हेंबरपासून इराणशी बँकिंग व्यवहारही बंद करण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे. इराणला आपली ‘हार्ड करन्सी’देखील वापरता येऊ नये. 

बातम्या आणखी आहेत...