आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीववरून भारतासोबत संघर्ष नको, चीनची भूमिका;चर्चेसाठी ‘योग्य’ तारखा उपलब्ध नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- मालदीवमधील राजकीय संकटावर तोडगा काढण्यासाठी आम्ही भारताच्या संपर्कात आहोत. आता मालदीवच्या मुद्द्यावरून आम्हाला भारताशी संघर्ष नको आहे, असे चीनने शुक्रवारी स्पष्ट केले.


भारत आणि चीन यांच्यात डोकलाम मुद्द्यावरून तसेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यास चीनने विरोध केल्याच्या मुद्द्यावरूनही वाद निर्माण झाला होता. मालदीवबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग म्हणाले की, मालदीवमधील संकट हा तेथील अंतर्गत प्रश्न आहे. सर्व संबंधित पक्षांशी चर्चा आणि सल्लामसलत करूनच तो सोडवायला हवा. आंतरराष्ट्रीय समुदायाने मालदीवचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य यांचा सन्मान करावा, अशी आमची भूमिका आहे.


मालदीवमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे या वृत्ताकडे गेंग यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, इतर देशांत हस्तक्षेप न करणे हे आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचे तत्त्व आहे. मालदीवच्या अध्यक्षांच्या दूताने चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी तेथील सद्य:स्थितीबाबत चर्चा केली अाहे. त्यावर कायद्यानुसार तोडगा काढण्यास मालदीव सरकार वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले आहे. वरिष्ठ न्यायमूर्ती आणि नेत्यांना मालदीव सरकारने तुरुंगात टाकले आहे. मग मालदीव हा प्रश्न स्वतंत्रपणे आणि एकतर्फी कसा काय सोडवू शकेल, या प्रश्नावर उत्तर देताना येंग म्हणाले की, अंतर्गत संकट कसे सोडवणार हा प्रश्न मालदीव सरकारलाच विचारायला हवा.


मालदीव प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचीही बैठक झाली. मालदीवमध्ये हिंसक घटना घडल्या नसल्या तरी तेथील परिस्थिती तणावपूर्ण असून ती आणखी बिघडण्याची शक्यता आहे, असे युनोचे सहायक सरचिटणीस मिरोस्लाव्ह जेंका यांनी सुरक्षा परिषदेला सांगितल्याचे वृत्त  आहे.

 

चर्चेसाठी ‘योग्य’ तारखा उपलब्ध नाहीत : भारत
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशाचे आर्थिक विकासमंत्री मोहम्मद सईद यांना आपला दूत म्हणून चीनमध्ये पाठवले आहे. मालदीवचे परराष्ट्रमंत्री विशेष दूत म्हणून भारतात येणार आहेत, पण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ‘योग्य’ तारखा उपलब्ध नाहीत, असे भारताने म्हटले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...