आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी एर्दोगन यांचीच निवड; विरोधकांना पराभव मान्य नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्तंबूल- राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांचा राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत विजय झाला असल्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून तुर्कीच्या सर्वोच्च पदावर एर्दोगन आहेत. पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा हे पद त्यांच्याकडे आले आहे. विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर टीका केली असून पक्षपाती निवडणुका झाल्याचे म्हटले आहे. तुर्कीत राष्ट्राध्यक्षपदासाठी व संसदीय निवडणूक एकाच वेळी घेण्याचा हा पहिला प्रसंग आहे. पहिल्याच फेरीत एर्दोगन यांना निर्भेळ बहुमत मिळाले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 


अनेक राजकीय विश्लेषकांनी काढलेल्या अनुमानांपेक्षाही एर्दोगन यांना जनमताचा भक्कम कौल मिळाला आहे. ६४ वर्षीय एर्दोगन हुकूमशाही वृत्तीचे असल्याची टीका अनेकदा विरोधकांनी केली आहे. सोमवारी पहाटे ३ वाजता त्यांनी अंकारा येथे आपल्या विजयानंतर जनतेला संबोधित केले. त्यांच्या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीचे (एकेपी) हजारो समर्थक या वेळी रस्त्यावर उतरून जल्लोष करत होते. 


२ वर्षांपासून आणीबाणी; अधिकृत वृत्तसंस्थेचा वापर प्रचारासाठी केल्यावरून टीका 
अनाडोलू या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेली माहिती तुर्कीतील अनाडोलू या अधिकृत वृत्तसंस्थेच्या माध्यमातून निकाल जाहीर करण्यात आला. या प्रक्रियेवर विरोधकांनी टीका केली. एर्दोगन यांना ५२.५ % तर इंचे यांना ३०.७ % मते मिळाली. सुप्रीम इलेक्शन बोर्डाने (वायएसके) अद्याप प्रसिद्धिपत्रक जारी केलेले नाही. तुर्कीच्या तुरुंगात असणारे कुर्दीश डेमॉक्रॅटिक पार्टीचे नेते आणि मानवाधिकार वकील सेलाहत्तीन देमिरतास यांना ८.४% मते पडली. 


संसदीय निवडणुकीत एर्दोगन यांच्या पक्षाला २९३ जागा

तुर्कीत प्रथमच राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसोबतच संसदीय निवडणूक घेण्यात आली. यात एर्दोगन यांच्या एकेपी पक्षाला ६०० पैकी २९३ जागा मिळाल्या. नॅशनलिस्ट मूव्हमेंट पार्टीशी एकेपीची युती असून या पक्षाला ५० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एर्दोगन यांच्याकडे निर्भेळ बहुमत आहे. 


प्रतिस्पर्धी मुहर्रम इंचे यांना ३१ % मते मिळाली 
एर्दोगन यांचे प्रतिस्पर्धी आणि रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे नेते मुहर्रम इंचे यांना ३१% मतदारांनी समर्थन दिले. निकालानंतर मात्र रिपब्लिकन पीपल्स पार्टीकडून पराभवाचा स्वीकार झालेला नाही. तुर्कीतील अधिकृत वृत्तसंस्था अनाडोलूच्या कारभारावर विरोधकांनी टीका केली आहे. ही वृत्तसंस्था एर्दोगन यांच्या विजयासाठी अखंड राबत होती, असा आरोप इंचेंनी केला. हुरियत दैनिकाने एर्दोगन यांच्या विजयाची ठळक बातमी दिली. 'बिरगन ' वृत्तपत्राने म्हटले की, 'अवैध निवडणुका आणि गूढ मतमोजणी प्रक्रिया'आहे. 

बातम्या आणखी आहेत...