आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषी शरीफ कुटुंबीयांच्या याचिकेवर आज सुनावणी; शरीफ कुटुंबीय निर्दोष असल्याचा याचिकेद्वारे दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. सध्या ते रावळपिंडीतील अदियाला कारागृहात कैद आहेत. सोमवारी नवाझ, मरियम आणि मरियमचे पती निवृत्त कॅप्टन मोहंमद सफदर यांनी या निर्णयाला आव्हान देणारी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात यावर आज सुनावणी होणार असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. 


१३ जुलै रोजी शरीफ व त्यांची कन्या मरियम यांना लाहोर येथे अटक केली होती. लंडनमधील ४ अालिशान सदनिका शरीफ कुटुंबीयांच्या असून भ्रष्टाचाराच्या पैशातून त्या खरेदी केल्याप्रकरणी कोर्टाने त्यांनी दोषी ठरवले. ८ जुलै रोजी शरीफ यांचे जावई सफदर यांना अटक केली होती. 


शरीफ कुटुंबीयांनी या निकालाला आव्हान देणाऱ्या ७ विविध याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. यातील ३ याचिका शरीफ यांच्या, तर प्रत्येकी दोन याचिका मरियम व त्यांचे पती सफदर यांच्या बचावासाठी दाखल केल्या आहेत. 


सहकार्य न केल्याने अतिरिक्त शिक्षा : शरीफ यांनी नॅशनल अकाउंटेबिलिटी कोर्टाला चौकशीदरम्यान सहकार्य न केल्याने त्यांनी १ वर्षाची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. शरीफ यांच्या वकिलाने इस्लामाबाद कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने शरीफ यांना ८० लाख पाउंड व मरियमला २० लाख पाउंडाचा दंड सुनावला आहे. 


देशच तुरुंग झालाय : नवाझ 
पाकिस्तान मुस्लिम लीग-नावाझचे नेते नवाझ शरीफ यांनी देशातील राजकारणाचा स्तर खालावला असल्याचे म्हटले आहे. यामुळे संपूर्ण देशच तुरुंग झाला आहे. देशाला वाचवण्यासाठी जनतेने आपल्या पक्षाला मते द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांची या संदेशाची रेकॉर्डिंग सर्वत्र प्रसारित केली जात आहे. २५ जुलै रोजी पाकमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत. जनतेशी संपर्क संपुष्टात यावा यासाठीच आपल्याला कैदेत टाकले असल्याचे शरीफ म्हणतात. शरीफ पनामा पेपर प्रकरणीही दोषी आहेत, तर मरियम लंडनमधील सदनिकाप्रकरणी दोषी ठरल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...