आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियामध्ये त्वरित शस्त्रसंधीची अंमलबजावणी करा-गुटरेस; सिरिया शस्त्रसंधी पेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीनिव्हा- संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटानिआे गुटरेस यांनी सिरियामध्ये त्वरित ३० दिवसांच्या शस्त्रसंधीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दमास्कसमधील फौजा पूर्व घाऊतमध्ये सतत बॉम्बहल्ले करत आहेत. सुरक्षा समितीच्या ठरावास गुटरेस यांनी मंजुरी दिली आहे. मात्र अंमलबजावणी होत असल्याचे सध्या चित्र नाही. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेच्या जिनिव्हामध्ये सुरू झालेल्या ३७ व्या सत्रामध्ये गुटरेस यांनी त्वरित अंमलबजावणीचे आदेश दिले. मानवाधिकार संघटनेचे प्रमुख झैद राद अल हुसेन यांनी सिरियातील बळी व जखमींच्या स्थितीविषयीचा तपशील या वेळी दिला.  


सोमवारी झालेल्या हल्ल्यांत १० नागरिक ठार

शनिवारी संयुक्त राष्ट्राने शस्त्रसंधीला मंजुरी देऊनही रविवारी व सोमवारी घाऊतमध्ये बॉम्बहल्ले झाले. यात १० निरपराधांचा बळी गेला. पैकी ९ जण एकाच कुटुंबातील होते. येथील डोऊमा येथील इमारतीवर हवाई हल्ला झाला.

 

ढिगाऱ्याखाली हे कुटुंब दबले. रविवारी सिरियन फौजांनी अल-शिफोनिया येथे हल्ला केला होता.  सिरियन सरकारच्या फौजांसह रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत घाऊतमधील ५०० नागरिकांचा बळी गेला आहे. बळींमध्ये १२७ अल्पवयीन आहेत.  १८ फेब्रुवारीपासून येथे हल्ले सुरू आहेत. इसिस व नुसरा फ्रंटचीच शाखा असलेली तहरीर-अल-शाम घाऊतमध्ये तळ ठोकून असल्याचे बशर अल असद सरकारचे म्हणणे आहे.  

 

घाऊतमधील नागरिकांना दहशतवाद्यांनी आेलीस ठेवले : दिमित्री पेस्कोव्ह  
घाऊतमधील परिस्थिती बिकट असून दहशतवाद्यांनी येथील नागरिकांना आेलीस ठेवल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. दहशतवादी शस्त्रे खाली ठेवण्यास तयार नाहीत. रासायनिक शस्त्रांचा वापर दहशतवाद्यांनी केल्याचे पुरावे मॉस्को प्रशासनाकडे असल्याचा दावा दिमित्री यांनी केला. दरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी म्हटले आहे की, शस्त्रसंधीचे पालन सर्वच पक्षांनी करणे गरजेचे आहे.  

 

 

स्थायी सदस्यांकडून नकाराधिकाराचा गैरवापर : झैद  

मानवाधिकार संघटनाचे प्रमुख झैद राद अल हुसेन यांनी म्हटले आहे की, रशिया, चीन, अमेरिका हे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्य आहेत. नकाराधिकाराचा ही राष्ट्रे गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाकडे सिरियाचे प्रकरण जाणे गरजेचे आहे. सिरिया सध्या मानवी कत्तलखाना झाल्याचे झैद म्हणाले.  

 

कुर्दीश नेत्याच्या प्रत्यार्पणाची तुर्कीची मागणी   
सिरियाच्या कुर्दीश बंडखोरांचा नेता चेक प्रजासत्ताकामध्ये आश्रयाला आहे. कुर्दिशांचा नेता सालेह मुस्लिमचे प्रत्यार्पण चेकने करावे अशी मागणी तुर्कीने केली आहे. नुकतेच सालेह मुस्लिमला प्राग येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी कोर्टासमोर त्याची हजेरी होईल, असे चेक प्रशासनाने सांगितले आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...