आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिंगापूर/न्यूयॉर्क - पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक मंगळवारी कच्च्या तेलाचे दर साडेतीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलावरील शुल्क कमी करणार नसल्याचे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. सध्या पेट्रोलच्या किमती ५५ महिन्यांतील सर्वाधिक तर डिझेल विक्रमी उच्चांकीवर आहे. मंगळवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोल ७४.६३ रुपये आणि डिझेल ६५.९३ रुपयांवर होते.
भारत मागणीच्या ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. दोन वर्षांत या आयातीमध्ये ९ टक्के अाणि पाच वर्षांत १७ टक्के वाढ झाली आहे. मात्र, दोन वर्षांत कच्च्या तेलाच्या आयात खर्चात ३५ टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. कच्चे तेल महागल्यास आयातीवरील खर्चात आणखी वाढ होईल. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी स्वस्त होऊन महागाई वाढेल. इराणवर अमेरिका बंधने लावण्याची शक्यता असल्यामुळे मंगळवारी कच्चे तेल ७५.२७ डॉलर आणि अमेरिकी डब्ल्यूटीआय क्रूडचे भाव ६९.५६ डॉलर प्रतिबॅरलवर गेले आहेत. नोव्हेंबर २०१४ नंतरचा हा सर्वाधिक दर आहे. ब्रेंटमध्ये सहा दिवसांपासून वाढ होत आहे. डिसेंबर २०१७ नंतरची ही सर्वात लांब तेजी आहे. दोन महिन्यांत यात २० टक्के आणि आठ महिन्यांत ५० टक्क्यांनी दर वाढले आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने या वर्षी दर ८ डाॅलरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांनी तर हे दर १०० डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
बंधनामुळे जागतिक बाजारातील इराणचा पुरवठा कमी होईल
इराणवर अमेरिका बंधने लावण्याची शक्यता असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होत आहे. जागतिक बाजारात इराणमधील पुरवठा कमी होण्याची भीती आहे. केवळ इराणमुळे कच्चे तेल पाच डॉलरने महागण्याची शक्यता आहे. इराण ओपेक देशांमधील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प १२ मेपर्यंत बंधने लादण्याचा निर्णय घेणार आहेत. याआधी जानेवारीमध्ये इराणला अखेरचा दिलासा देत असल्याचे ते म्हणाले हाेते. इराणने २०१५ च्या अणुकरारातून बाहेर पडणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अमेरिका इराणवर व्यापारी बंधने लादण्याची शक्यता आहे
कच्चे तेल महागण्याची पाच कारणे अशी
1) सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने पुरवठा कमी केला आहे. कच्च्या तेलाचे दर ७० ते ८० डॉलरच्या दरम्यान ठेवण्याची सौदीची इच्छा आहे.
2) सौदीतील सरकारी कंपनी अरामकोची लिस्टिंग होणार आहे. कंपनीच्या जास्त मूल्यासाठी सौदीची दर वाढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे अरामकोचा महसूल वाढेल.
3) आशियात कच्च्या तेलाची मागणी उच्चांकावर आहे. चीनने मार्चमध्ये रशियातून २४ टक्के जास्त तेल आयात केले आहे. भारतातील आयात ३ टक्क्यांनी वाढली आहे.
4) अमेरिकेत कच्च्या तेलाच्या साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. यात २२.५ लाख बॅरलची घट होण्याचा अंदाज आहे. यामुळेही किमतीवर दबाव आहे.
5) जागतिक बाजारातील अतिरिक्त तेल संपले आहे. या वर्षी मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होण्याचा जागतिक संस्था “एनर्जी’चा अंदाज आहे.
पुढील स्लाईडवर पहा, पाच वर्षात आयातीवरील खर्च......
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.