आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल-हमासमध्ये शेकडो रॉकेट हल्ल्यांनंतर युद्धबंदी; सीमेवर हिंसाचारात झाली वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझा सिटी- गेल्या दोन दिवसांपासून इस्रायली सैन्य व हमास या दहशतवादी संघटना यांच्यात रॉकेट हल्ल्यांची चकमक सुरू होती. गाझा पट्ट्यातील हमासच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलच्या हवाई दलाने डझनावर रॉकेट हल्ले केले तर हमासने २०० रॉकेटचा इस्रायलच्या सीमा भागात मारा केला. परंतु रविवारी युद्धबंदी लागू झाल्याने सामान्य नागरिकांचा जीव भांड्यात पडला. 


इस्रायलने शनिवारी रात्रभर गाझा भागातील हमासच्या अड्ड्यांवर हल्ले केले. डझनावर रॉकेट हल्ले झाले. हमासचे मुख्यालय असलेल्या बेइट लाहिया येथील इमारतीला लक्ष्य करण्यात आले. येथे दहशतवादी प्रशिक्षण, शस्त्रसाठा केला जात होता. त्याला उडवण्यात आले. गाझा पट्ट्यापासून डेरॉट शहर जवळ आहे. आतापर्यंत हल्ल्यांत दोन पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. दोघेही किशोरवयीन आहेत तर तीन जखमी झाले. गाझा शहरातील पश्चिमेकडील भागात हल्ल्यांत त्यांचा मृत्यू झाला. गाझा शहरात २५ जण जखमी झाले. घटनेत चार इस्रायली जखमी झाले. डेरॉट शहरात हे रॉकेट पडल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांच्या हल्ल्या-प्रतिहल्ल्यानंतर रविवारची सकाळ गाझा पट्ट्यातील नागरिकांसाठी काहीशी शांतता घेऊन आली. इजिप्तच्या मदतीने हमास व इस्रायली सैन्य यांच्यात युद्धबंदीसाठी सहमती झाली. त्यावर इस्रायलने मात्र काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्राचे मध्य-पूर्वेतील राजदूत निकोलाय म्लादेनोव्ह म्हणाले, गाझातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 


२०१४ नंतरची भयंकर धुमश्चक्री 
गाझा पट्ट्यात इस्रायल सैन्य व हमास यांच्यात अनेक वेळा चकमकी झाल्या. परंतु शुक्रवार आणि शनिवारी रात्री झालेली धुमश्चक्री अधिक व्यापक आणि विध्वंसक मानली जाते. २०१४ नंतरची भयंकर धुमश्चक्री होती, असे तज्ज्ञांनी सांगितले. 


आमची घरे आम्हाला परत करा, पॅलेस्टाइनच्या नागरिकांची मागणी 
इस्रायलमध्ये आमची वडिलोपार्जित घरे आहेत. ही घरे आम्हाला परत मिळायला हवीत, अशी मागणी सीमेवरील आंदोलनादरम्यान पॅलेस्टाइन नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेक वेळा ही मागणी इस्रायलकडे करण्यात आली होती. पण ती इस्रायलने फेटाळली. सीमेवरील एका निदर्शनांवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ३० मार्च रोजी १४१ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला होता. 


गरज पडल्यास हल्ले वाढवणार : नेतन्याहू 
२०१४ नंतर पहिल्यांदाच सीमेवर युद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शनिवारी रात्री हमासच्या अड्ड्यांना नष्ट करण्यात आले. यापुढे आणखी हालचाली झाल्या व हल्ले वाढवण्याची वेळ पडल्यास हल्ले केले जातील, असा इशारा नेतन्याहू यांनी दिला. 


हिंसाचाराला हमास जबाबदार

गेल्या अनेक दिवसांपासून गाझा पट्ट्यात हमासने जोरदार निदर्शने, आंदोलने केली. तेव्हा सीमेवर अनेक ठिकाणी सुरक्षा दलासोबत संघर्ष उडाला होता. इस्रायलमध्ये हल्ले झाले. शेकडो रॉकेटही इस्रायलच्या सीमेवर डागण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...