आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका धास्तावली: क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा, 10 मिनिटे उडाला गाेंधळ, नागरिकांत पसरली भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- तुमच्या शहरावर काही क्षणांत क्षेपणास्त्र हल्ला होणार आहे. मिळेल तेथे आश्रय घ्या. घराबाहेर पडू नका, असा इशारा मिळाल्यावर कोणताही सुज्ञ नागरिक जिवाच्या भीतीने योग्य ती काळजी घेईल. असेच काहीसे चित्र रविवारी अमेरिकेतील हवाई राज्यात पाहायला मिळाले. परंतु हा इशारा चुकीने देण्यात आला होता, असे नंतर प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र तोपर्यंत सामान्य नागरिकांत चांगलीच भीती पसरली होती.  


क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा चुकीने देण्यात आला होता. त्यामुळे काही वेळ चांगला गोंधळ आणि नुसती घबराट उडाल्याचे पाहायला मिळाले. नंतर इशारा देणारे बटण चुकीने दाबल्याचे लक्षात आले. तत्पूर्वी लोकांनी घराबाहेर पडू नये, असे संदेश मोबाइल, दूरचित्रवाणी, नभोवाणीवरून देण्यात येत होते. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इशाऱ्याच्या दहा मिनिटांनंतर आणीबाणी व्यवस्थापन संस्थेने ट्विट करून क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका नसल्याचे जाहीर केले. त्यावर गव्हर्नर डेव्हिड इगे यांनी झाल्या त्रासाबद्दल जनतेची माफी मागितली. एका कर्मचाऱ्याकडून इशाऱ्याचे बटण चुकीने दबले गेले, असे सांगितले.  


नोकरीतील वेळ बदलाचा फटका  
आणीबाणी व्यवस्थापन संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेतील बदलातून ही मानवी चूक झाल्याचे गव्हर्नर यांनी कबूल केले. पाळी बदल करताना रुजू झालेल्या कर्मचाऱ्याने हे बटण चुकीने दाबले. त्यातून ही मोठी चूक झाली.  


जिवाच्या भीतीने लोक सैरावैरा धावत होते  
क्षेपणास्त्र कोसळणार असा इशारा मिळाल्यानंतर हवाईतील लोक सैरावैरा धावत होते. हवाई विद्यापीठात विद्यार्थी आश्रय मिळवण्यासाठी धावत होते, असे छायाचित्र सोशल मीडियात झळकले आहे.  


चौकशीची घोषणा  
अमेरिकेतील सरकारने इशारा देण्याच्या घटनेमुळे जनतेला मनस्तापाला सामोरे जावे लागले. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्याच्या क्षेत्रात येत असल्याने इशाऱ्याची व्यवस्था हवाई राज्यात तयार करण्यात आली आहे. 


हल्ला झाल्यास?  
कोरियाने हवाई राज्य टप्प्यात असल्याचे म्हटले होते. नागरिक धास्तावलेले आहेत. दोन्ही देशांतील शीतयुद्धाच्या केंद्रस्थानी हवाई आहे. उत्तर कोरियातून हवाईवर हल्ला झाल्यानंतर केवळ वीस मिनिटे अगोदर इशारा देता येईल. हवाईची लोकसंख्या १० लाख ४० हजारआहे.  


थेट चर्चा करण्याची वेळ आली  
इशारा मिळाल्यानंतर हवाईमधील जनतेच्या मनात स्वत: बद्दल आणि नातेवाइकांच्या सुरक्षेची भीती कशी दाटली हे आपण सर्वांनी अनुभवले. मी कोठे आश्रय घ्यावा ? माझ्या कुटुंबाचे अण्वस्त्रापासून संरक्षण कसे करू ? अशा प्रश्नांनी हवाईमधील नागरिक घाबरून गेले. म्हणूनच आता गंभीर होण्याची वेळ आली आहे. सरकारने उत्तर कोरियाच्या नेत्यांशी विनाअट थेट चर्चा सुरू करण्याची वेळ आली आहे.  
-तुलसी गबार्ड, सदस्य, काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...