आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमारचे राष्ट्रपती हतीन यांचा प्रकृतीचे कारण देत राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यांगून- म्यानमारचे राष्ट्रपती आणि स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांचे विश्वासू सहकारी असलेल्या हातीन क्वा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या २ वर्षांपासून ते या पदावर होते. म्यानमार राष्ट्रपती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर त्यांच्या राजीनाम्याची घोषणा करण्यात आली. 

 

आपल्याला विश्रांतीची गरज असल्याचे ७१ वर्षीय हातीन क्वा यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांना उपचारासाठी परदेशी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा सादर केला असावा, असा अंदाज काही राजकीय नेत्यांनी वर्तवला आहे. येत्या ७ दिवसांत त्यांच्या पदावर दुसरी व्यक्ती येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. १९६२ पासून म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता आहे. २०१६ मध्ये प्रथमच येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. यामध्ये हातीन क्वा यांना विजय मिळाला. ते पहिले लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले राष्ट्रपती आहेत. त्यांच्या निवडीनंतर स्टेट काैन्सिलरपदी आंग सान स्यू की यांची निवड झाली.  


स्टेट काैन्सिलरचे अधिकार राष्ट्रपतींपेक्षा वाढवले होते  
स्टेट काैन्सिलर आंग सान स्यू की यांचे पती ब्रिटिश वंशाचे होते. त्यांची दोन्ही अपत्ये ब्रिटिश वंशाची आहेत. परदेशी वंशाचा जोडीदार असलेल्या व्यक्तीला म्यानमारचे सर्वोच्च पद दिले जात नाही, असे घटनेत नमूद आहे. त्यामुळे हातीन क्वा या विश्वासू सहकाऱ्याकडे आंग सान स्यू की यांच्या पक्षाने राष्ट्रपतिपद दिले होते.


 स्टेट कौन्सिलर हे पद राष्ट्रपतींपेक्षा शक्तिशाली असेल, असे स्यू की यांनी त्या वेळी जाहीर केले होते.  स्यू की यांचे प्रतिनिधी म्हणून ते पदावर होते. परराष्ट्रमंत्री पदाचा कार्यभारही हातीन यांच्याकडे होता.  

 

मायींट स्वे कोण आहेत?  

म्यानमारमध्ये दोन उपराष्ट्रपती असतात. पैकी प्रथम क्रमांकाचा उपराष्ट्रपती हा घटनेनुसार राष्ट्रपतिपदी येऊ शकतो. मायींट स्वे हे प्रथम उपराष्ट्रपती आहेत. ते पदावर येण्याची शक्यता आहे. ते लष्कराचे प्रतिनिधी असून त्यांना नामांकनही लष्कराने दिले होते. त्यांच्या पाठीशी संसदेतील २५% मते आहेत. मायींट हे सैन्यात लेफ्टनंट जनरलपदी आहेत. म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता असताना अमेरिकी लेखा विभागाने त्यांना २००७ मध्ये काळ्या यादीत टाकले होते.  लोकशाहीविरोधी कारवायांसाठी ते आंतरराष्ट्रीय समुदायासमोर गुन्हेगार होते. शिवाय त्यांच्या आर्थिक व परदेशी दौऱ्यांवरही बंदी घालण्यात आली होती. २०१६ मध्ये स्यू की यांच्या प्रशासनातील पदाधिकारी म्हणून त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. थान श्वे या माजी व शेवटच्या लष्करशहांचे ते विश्वासू मानले जात होते.

 

राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेची शक्यता

हातीन क्वा हे नामधारी राष्ट्रप्रमुख होते. मात्र, यापुढे राष्ट्रपतिपदाचे अधिकार स्टेट कौन्सिलरच्या आधीन असू नयेत, असे मत राजकीय तज्ज्ञ खिन झ्वा यांनी मांडले आहे. खिन हे येथील धोरणात्मक सल्ला देणाऱ्या थाम्पदीपा संस्थेचे संचालक आहेत. हातीन क्वा यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्चस्वाची स्पर्धाही निर्माण होऊ शकते. स्टेट कौन्सिलर पदाला लष्कराचा विरोधच राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदावर आक्रमक व्यक्ती आल्यास आंग सान स्यू की यांच्या निर्णय क्षमतेला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...