आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जी-7’ मधील राष्ट्रांची रशियाविरुद्ध एकजूट; असद हटाववरही एकमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जी-७’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री. - Divya Marathi
‘जी-७’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री.

टोरांटो- ‘जी-७’ संघातील राष्ट्रांनी रशियाविरुद्ध एकजूट करण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये शांतता व सुरक्षेसाठी रशियाचे धोरण धोकादायक असल्याचा सूर सर्व राष्ट्रांनी आळवला. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जी-७’ राष्ट्रे रशियाशी वाटाघाटी करण्यास सहमत आहेत. युद्धग्रस्त देशांच्या भूमीवरील रशियाच्या धोरणाविरुद्ध ही एकजूट आहे.  


परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये रशिया, इराण आणि उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. व्हेनेझुएला आणि म्यानमारमधील राजकीय समस्यांवरदेखील या वेळी माहितीचे आदान-प्रदान झाले. रशिया स्वत:ला शक्तिशाली राष्ट्र मानत असेल, तर त्यांनी जी-७ देशांशी चर्चेला तयार व्हावे, अशी एकमुखी मागणी परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत करण्यात आली. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैयको मास यांनी, सिरिया संकटातून तोडगा काढण्यासाठी रशियाने मदत करावी, असे आवाहन केले आहे. सिरियातील परिस्थिती रशियाच्या मदतीशिवाय सर्वसामान्य होणे शक्य नाही, असे मास म्हणाले.  

 

रासायनिक हल्ल्यानंतर प्रथमच उच्चस्तरीय चर्चा

७ एप्रिल रोजी सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाला. यात निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने संयुक्तरीत्या सिरियात राबवलेल्या मोहिमेत १०५ क्षेपणास्त्र हल्ले केले. रासायनिक शस्त्रे नष्ट करण्यासाठी हे हल्ले करण्यात येत असल्याचे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनी म्हटले होते. या सर्व घटनाक्रमानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सिरियातील युद्धाविषयी उच्चस्तरीय चर्चा टोरांटोमध्ये झाली. पाश्चात्त्य राष्ट्रांनी सिरियातील तुंबळ युद्धासाठी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना दोषी ठरवले आहे. दरम्यान, असद सरकार आणि रशियाने रासायनिक शस्त्रांचा वापर केला नसल्याचा दावा केला आहे.

 

सिरियातील सत्ताबदल अनिवार्य असल्याचे मत

जी- ७ देशांच्या दोनदिवसीय बैठकीमध्ये सिरियाविषयी ‘असद हटाव’चा सूर स्पष्ट उमटला. सिरियाचे राष्ट्रप्रमुख बशर अल असद हेच तेथील युद्धग्रस्ततेला जबाबदार असून सत्ताबदल होणे गरजेचे आहे, यावर सर्व देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सहमती दर्शवली. संयुक्त राष्ट्राच्या  ‘जिनिव्हा प्रोसेस’चा पुनरुच्चार येथे करण्यात आला. सिरियात राजकीय प्रक्रियेला वेग येणे गरजेचे अाहे. इराण आणि उत्तर कोरियाच्या बाबतीतदेखील राजकीय प्रक्रिया गतिशील करणे गरजेचे असल्याचे पाश्चात्त्य देशांचे म्हणणे आहे. युद्धग्रस्त राष्ट्रांमध्ये राजकीय मतांना डावलण्यात येत असल्याकडे जी-७ देशांच्या बैठकिमध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. असद सरकारविरुद्ध निषेध नोंदवला गेला. 

 

‘जी-७’ अर्थात ग्रुप ऑफ सेव्हन राष्ट्रे
‘जी-७’ मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका या ७ देशांचा समावेश आहे. या आैद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या देशांची बैठक नुकतीच टोरांटो (कॅनडा) येथे संपन्न झाली. सर्व देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिरिया मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, रशिया सिरियाला क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली देणार...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...