आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात परत येण्याचा नवाझ, मरियम यांचा निर्णय; १३ जुलैला लाहोरला परत येण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांनी सर्व अटकळी खारीज करत मायदेशी येण्याचा निर्णय घेतला आहे. 'द ट्रिब्युन एक्स्प्रेस' या पाकिस्तानी वृत्तपत्रानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 


मरियम यांनी लंडनमध्ये रविवारी पत्रकारांना सांगितले की, माझे वडील नवाझ शरीफ आणि मी १३ जुलैला लाहोरला परतण्याची शक्यता आहे. याआधी आम्ही लंडनहून इस्लामाबादला येणार होतो. लोक शिक्षेपासून बचाव व्हावा म्हणून देशातून पळून जातात, पण आम्ही शिक्षेचा सामना करण्यासाठी परत येत आहोत. आपण अटक करवून घेऊ, असे सांगत शरीफ यांनी एक उदाहरण घालून दिले आहे. त्यांचे हे बलिदान वाया जाणार नाही. त्याचा फायदा आगामी पिढ्यांना मिळेल. नवाझ शरीफ यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला असल्याने पूर्ण देश आमच्यासोबत आहे, पण काही लोक पाठीत वेदना होत असल्याचा बहाणा करून देशातून पळून जातात, अशी टिप्पणी मरियम यांनी माजी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांचे नाव न घेता केली. 'ट्रिब्यून एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम हे मायदेशी परत येताच त्यांना अटक करण्याबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील. 


उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात नवाझ शरीफ, त्यांची मुलगी मरियम, जावई कॅप्टन (सेवानिवृत्त) मोहंमद सफदर यांना शुक्रवारी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 


नवाझ यांच्या जावयाची तुरुंगात रवानगी 
शरीफ यांचे जावई कॅप्टन (सेवानिवृत्त) मोहंमद सफदर यांना नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) न्यायालयाने सोमवारी अदियाला तुरुंगात रवानगी केली. सफदर यांना रविवारी अटक करण्यात आली होती. त्यांना सोमवारी एनएबीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सफदर यांना न्यायालयात आणण्यात आले तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना न्यायालयात प्रवेश नाकारण्यात आला. काही पत्रकारांना धक्के मारून न्यायालयातून बाहेर काढण्यात आल्याचेही वृत्त आहे.

बातम्या आणखी आहेत...