आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे निर्बंध युद्धासाठी चिथावणी देणारे; उत्तर कोरियाची नाराजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने नवा निर्बंध लादण्याची केलेली कृती युद्धासाठी चिथावणी देण्यासारखी आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर कोरियाच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे. सरकारी प्रसारमाध्यमातून हा दावा करण्यात आला आहे.  

 

कोरियाच्या सार्वभौमत्वाला नाकारून त्याला आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे शांतता आणि स्थैर्याला धक्का पोहोचू शकतो, असा इशारा कोरियाच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे. सुरक्षा परिषदेच्या निर्बंधाच्या ठरावाला मित्र राष्ट्र असलेल्या चीननेदेखील पाठिंबा दिला आहे. ही गोष्ट कोरियाच्या दृष्टीने धक्कादायक ठरली. उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची तीन आठवड्यांपूर्वी चाचणी घेतली होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने कोरियाला अणू कार्यक्रम थांबवण्याची सूचना केली होती. अमेरिकेने तर त्यासंबंधीचा कडक इशाराही दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करून कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. त्यामुळे शनिवारी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेने सादर केलेल्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. पंधरा सदस्य राष्ट्रांनी सर्वानुमते या ठरावावर स्वाक्षरी केली होती. दुसरीकडे तीन आठवड्यांपूर्वी चाचणी करण्यात आलेले क्षेपणास्त्र अमेरिकेतील अनेक शहरांना उद्ध्वस्त करू शकते, अशी धमकी कोरियाने दिली होती. त्यावरून अमेरिका-कोरिया यांच्यातील शाब्दिक युद्धही सुरू होते.  


का झाली नाराजी ?
उत्तर कोरियाचे ऊर्जा व्यवस्था मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. सुरक्षा परिषदेच्या निर्बंधामुळे कोरियाची सुमारे ९० टक्के तेलाची आयात बंद होणार आहे. त्याचबरोबर आगामी दोन वर्षांत परदेशात असलेल्या १ लाख कोरियन नागरिकांना नोकरी सोडून मायदेशी परतावे लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशाचे आर्थिक व राेजगाराच्या पातळीवरदेखील नुकसान होणार आहे.


ठराव फेटाळला, शांततेवर परिणाम
त्यामुळेच हा ठराव आमच्या सार्वभौमत्त्वामध्ये हस्तक्षेप असून शांतता व स्थैर्याला धोका निर्माण करणारी कृती असल्याचे वर्णन करून कोरियाने हा ठराव फेटाळून लावला आहे. सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली किंवा नाही, याचा तपशील समजू शकला नाही. रविवारी भूमिका जाहीर केली आहे.


सहा चाचण्यांमुळे जगभरात चिंता
उत्तर कोरियाने आतापर्यंत सहा क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सर्व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून कोरियाने अणु कार्यक्रम सुरूच ठेवला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील चिंतेत जास्त भर पडली होती.


अणू कार्यक्रम थांबवणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम
अमेरिकेसह सुरक्षा परिषदेने निर्बंधाचा ठराव करून उत्तर काेरियाला एकाकी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचा अणु कार्यक्रम मुळीच थांबणार नाही, असे उत्तर कोरियाने स्पष्ट करून आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. वास्तविक अणू कार्यक्रम स्वसंरक्षणासाठी तयार करण्यात आल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. सत्ताधारी पक्षाची परिषद शनिवारी झाली होती. त्यात धोरणांचे समर्थन करण्यात आले होते. 


निर्बंध समस्या सोडवण्यासाठी हवेत : चीनने मांडली भूमिका
निर्बंध हे कोरिया क्षेत्रातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने असले पाहिजेत. या क्षेत्रात नि:शस्त्रीकरण करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असून शांतता आणि स्थैर्यासाठी आम्ही आग्रह आहोत, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हुवा चुनयिंग यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...