आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध नको, उत्तर कोरियाचा संयुक्त राष्ट्राला सांगावा; फेल्टमन यांनी सादर केला दौऱ्याचा अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र- संयुक्त राष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा प्योंगयांग दौरा नुकताच पूर्ण झाला. उत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून आपल्याला युद्ध नको आहे, असा संदेश त्यांनी संयुक्त राष्ट्राला पाठवला आहे. आपल्याकडे संवादासाठी ठोस प्रस्ताव आलेला नाही, असेही उ. कोरियाचे म्हणणे आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे राजकीय प्रकरणांचे प्रमुख जेफरी फेल्टमन यांनी दिली. प्योंगयांग  दौऱ्यानंतर जेफरी फेल्टमन यांनी सुरक्षा समितीकडे आपल्या दौऱ्याचा अहवाल सादर केला. फेल्टमन यांनी उ. कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग हो आणि उपपरराष्ट्रमंत्री पाक मेयाँग कुक यांच्याशी चर्चा केली. वर्ष २०११ नंतर प्रथमच संयुक्त राष्ट्राच्या उच्च प्रतिनिधीने उ. कोरिया दौरा केला आहे.    


या चर्चेदरम्यान पुरवणी चर्चेविषयी उत्तर कोरियाने मंजुरी दिलेली नाही.  आपला हा दौरा नव्या संवादाची सुरुवात करेल अशी आशा जेफरी फेल्टमन यांनी व्यक्त केली. मात्र उत्तर कोरियाने कोणतेही वचन किंवा आश्वासन संयुक्त राष्ट्राला देणे टाळले. शिवाय उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेतृत्वाविषयी संयुक्त राष्ट्राची भूमिका काय आहे हे जाणून घेणेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते, असे फेल्टमन यांना चर्चेदरम्यान जाणवले. महासत्तांशी संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून संवादाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. 

 

ट्रम्प विरुद्ध टिलर्सन  
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांच्या अगदी विरुद्ध भूमिका टिलर्सन यांनी मांडली आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपल्या मतावर ठाम असल्याचे व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अमेरिकेत आता उ. कोरिया धोरणाविषयी ट्रम्प विरुद्ध टिलर्सन अशी स्थिती निर्माण झाली आहे. टिलर्सन म्हणाले की, अण्वस्त्र निर्बंध हा काही चर्चा सुरू करण्याचा मार्ग असू शकत नाही. सर्वात मोठा धोका चर्चा बंद होणे आहे. हुकूमशहा किम जोंग उन यांचा अणू कार्यक्रम संरक्षणार्थ नाही. तो जगातील सर्वोच्च अण्वस्त्र समृद्ध देश होण्याच्या महत्त्वाकांक्षेचा कार्यक्रम आहे. 

 

उ. कोरियाशी बिनशर्त चर्चेस तयार : टिलर्सन  

अण्वस्त्र कपातीसंबंधी उत्तर कोरियाशी बिनशर्त चर्चा करण्यास अमेरिका तयार आहे. प्योंगयांगसाठी अमेरिकेने आपले ताठर धोरण सोडल्याचे संकेत परराष्ट्र सचिव रेक्स टिलर्सन यांनी दिले. दोन आठवड्यांपूर्वीच उ. कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीन स्तरांवर उ. कोरियावर निर्बंध लादलेले असताना आता अमेरिकेने चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.  अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याच्या शर्तीवरच अमेरिका वाटाघाटी करेल, असे पूर्वी टिलर्सन म्हणाले होते. अटलांटिक कौन्सिल कोरिया फाउंडेशन फोरमने आयोजित केलेल्या चर्चासत्रात टिलर्सन यांनी बिनशर्त चर्चेचा प्रस्ताव दिला. उ. कोरियाने अण्वस्त्र कार्यक्रमात मोठी गुंतवणूक केली असताना तो बंद करण्याच्या पूर्वअटीवर प्रस्ताव ठेवणे अवास्तव असल्याचे टिलर्सन म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...