आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाची गुप्त ठिकाणी अण्वस्त्रे दडवण्याची तयारी; अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- एकीकडे जागतिक पातळीवर शांततेसाठी तयारी दर्शवत असलेल्या उत्तर कोरियाने आपली काही अण्वस्त्रे अमेरिकेपासून दडवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ही अण्वस्त्रे गुप्त ठिकाणी लपवली जात आहेत. एवढेच नव्हे तर अण्वस्त्र वाढवण्याचेही प्रयत्न आहेत. उत्तर कोरिया संपूर्ण अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळण्याची शक्यता नाही असा निष्कर्ष अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने काढला आहे. 


हा दावा खरा असल्यास कोरियाची जाहीर व छुपी भूमिका यामधील विरोधाभास दिसून येत आहे. कारण १२ जून रोजी किम जाेंग उन व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सिंगापूरमधील बैठकीत शांततेसाठी आणाभाका घेण्यात आल्या होता. त्यात उन यांनी संपूर्ण नि: शस्त्रीकरण करण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या बदल्यास अमेरिकेने सुरक्षेची हमी घेतली पाहिजे, अशी शर्त देखील होती. परंतु प्रत्यक्षात उत्तर कोरियाने छुप्या पद्धतीने अण्वस्त्र कार्यक्रम सुरू ठेवण्याची रणनीती ठेवली आहे, असे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. 


गुप्तचर यंत्रणेतील चार अधिकाऱ्यांनी गेल्या काही आठवड्यात संकलित केलेल्या तथ्यांच्या विश्लेषणानंतर हा दावा केला आहे. किम व ट्रम्प यांच्या बैठकीनंतर उत्तर कोरियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष देण्यात आले होते. 


६५ अण्वस्त्रे, युरेनियम अज्ञात ठिकाणी ठेवल्याचा संशय 
उत्तर कोरियाकडे ६५ अण्वस्त्रे असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याशिवाय प्योंगयांगपासून उत्तरेला सुमारे ९६ किलोमीटर अंतरावर उत्तर कोरियाने युरेनियमचाही मोठा साठा दडवला आहे. तो भूगर्भात अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आल्याचा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. 


कॉस्मेटिक कारखान्याचा किम यांनी केला दौरा 
उत्तर कोरिया व चीन यांच्या सीमेवरील कॉस्मेटिक कारखान्याला नुकतीच किम जोंग उन यांनी भेट दिली. हा प्रदेश किम जाेंग यांचे वडील किम जाेंग इल यांनी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. चीनसोबत संयुक्त आर्थिक योजना सुरू करणे, असा उद्देश त्यामागे होता. 


अण्वस्त्र संशोधन केंद्र वेगाने विकसित
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रविषयक हालचालींवर आणखी बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यात कोरिया याँगब्यॉन येथील अण्वस्त्र संशोधन केंद्राचा वेगाने विकास करत असल्याचे उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे. कोरियाच्या कथनी आणि करणीत फरक असल्याचा आरोप गुप्तचर अधिकाऱ्यांनी अहवालाद्वारे केला आहे. 


तणाव दूर करण्यासाठी दक्षिण व उत्तर कोरियांत सागरी संपर्क 
दक्षिण व उत्तर कोरियात आता सागरी संपर्क यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. दहा वर्षांत पहिल्यांदाच दोन्ही देशांत सागरी क्षेत्रातील सुरक्षेसंबंधी समन्वयाची भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे उभय देशांत तणाव व संघर्ष निर्माण होणार नाही. दोन्ही देश या क्षेत्रात संपर्कातून सक्षम बनू शकतील. 


निर्बंध हटवण्यासाठी मदत करा, किम यांची शी यांना विनंती
आम्ही अमेरिकेसोबत यशस्वी बैठक केली आहे. आमच्यावरील आर्थिक निर्बंध हटवण्यात यायला हवेत. अमेरिकेने हे निर्बंध लादले आहेत. निर्बंधामुळे आम्हाला अतिशय वेदना होत आहेत. म्हणूनच हे निर्बंध लवकर मागे घेण्यात यावे. त्यासाठी तुम्ही (चीन) मदत करावी, असे किम जोंग यांनी म्हटले आहे. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत किम यांनी भूमिका मांडली. 

बातम्या आणखी आहेत...