आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या स्थलांतरण धोरणाविरुद्ध ५० राज्यांत ७५० पेक्षा जास्त फेऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेत रविवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरण धोरणाच्या विरोधात ५० राज्यांत निदर्शने झाली. त्यात ५ ते १० लाख लोक सहभागी झाले. आई-वडिलांपासून वेगळे राहत असलेल्या निर्वासित मुलांची भेट घडवण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. ट्रम्प यांना विरोध दर्शवण्यासाठी लोकांनी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला. त्यात म्युझिक शो, शांतता फेरी, पांढऱ्या पोशाखातील फेरी यांचा समावेश होता. पूर्ण अमेरिकेत असे ७५० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. स्थलांतरितांच्या मुद्द्यावरील ही सर्वात मोठी निदर्शने होती. 


अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवरून अवैधरीत्या अमेरिकेत येणाऱ्या लोकांच्या विरोधात या वर्षी ५ मे रोजी झीरो टॉलरन्स धोरण लागू केले होते. त्यामुळे २३४२ मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपासून वेगळ्या शिबिरांत ठेवण्यात आले होते. जगभरात मोठा विरोध झाल्यानंतर ट्रम्प यांनी ७ आठवड्यांनी आपला आदेश मागे घेतला होता. 

 

मागणी : ट्रम्प यांचा आदेश लवकर लागू व्हावा, स्थलांतरितांची अटक थांबावी 
निदर्शकांच्या मते, ट्रम्प यांच्या आदेशाचा २० दिवसांनंतरही काही परिणाम झाला नाही. मुले आधीप्रमाणेच शिबिरात कुटुंबीयांपासून दूर आहेत. मुलांना त्यांच्या आई-वडिलांसोबत ठेवावे. पोलिसांनी स्थलांतरितांना अटक करणे बंद करावे. गुरुवारी स्थलांतरण धोरणाला विरोध करणाऱ्या ६०० महिलांना अटक केली होती. ३० दिवसांत मुलांची कुटुंबीयांशी भेट घालून द्यावी, असा कॅलिफोर्नियाच्या एका न्यायालयानेही आदेश दिला होता. 


निदर्शने: वॉशिंग्टनमध्ये १२ वर्षीय मुलीने लोकांना केले संबोधित 
ही निदर्शने अमेरिकेच्या मोठ्या शहरांपासून लहान गावांपर्यंत झाली. त्याला 'फॅमिली बिलाँग टुगेदर' असे नाव देण्यात आले होते. वॉशिंग्टनमध्ये लेह या १२ वर्षीय स्थलांतरित मुलीने लोकांना संबोधित केले. ती म्हणाली की, मला ही भीती बाळगून जगायचे नाही. मी झोपू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही, हे भीतिदायक आहे. ते लोक मला माझ्या आईपासून वेगळे करतील, अशी भीती मला सतत वाटते. लॉस एंजलिसमध्ये गायक जॉन लीजेंड याने गाणे गाऊन विरोध दर्शवला.