आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ राजकारणी एन. एम. अाव्हाड यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर / नाशिक- जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते, स्तंभलेखक, साहित्यिक व जुन्या पिढीतील अार्किटेक्ट इंजिनिअर निवृत्ती महादू तथा एन. एम. अाव्हाड (७९) यांचे अल्पशा अाजाराने निधन झाले. गेल्या अाठवड्यात मूत्रविकारावरील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मनाेरमा, अनिल, अॅड. संदीप व अार्किटेक्ट प्रशांत ही तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार अाहे. नाशिकमधील व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात अाले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. 


सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रहिवासी असलेले अाव्हाड तीन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेले. तेथे अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती म्हणून त्यांची दशकभराची कारकीर्द गाजली. वंजारी समाजाचे नेते, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नायगाव येथील गाेदा युनियन कृषक सहकारी संस्थेचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संचालक अशा विविध स्तरांवर त्यांनी काम केले. वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, सुधाकर नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, गाेपीनाथ मुंडे अशा अनेक दिग्गज नेत्यांशी व्यक्तिगत संपर्क असलेले अाव्हाड उत्तम वक्ते, नर्मविनाेदी भाष्यकार व काेणाशी शत्रुत्व नसलेले समाजकारणी म्हणून अाेळखले जात. समाजकारण, राजकारणासाेबतच भूकंप, त्सुनामी, पाऊस, वातावरणातील बदल अशा अनेक विषयांवर त्यांचा अभ्यास हाेता. त्यावर त्यांनी वृत्तपत्रातून विपुल लेखन केले. 'वाकडी वाट' हा कवितासंग्रह, दूरचे डाेंगर, जनमानसातील माणसं, विज्ञान तरंग तसेच संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे निरुपण करणारे 'चेतना चिंतामणींचे ठाव' असे त्यांचे साहित्यातील याेगदान अाहे. सिन्नरमधून विधानसभा व नाशिक लाेकसभेची निवडणूक त्यांनी लढवली. अखेरच्या काळात भाजपात काम करताना २००४ साली त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली. 

बातम्या आणखी आहेत...