आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या ११ दिवस आधी नवाझ शरीफ मरियमसह मायदेशी; भाषण रोखण्यासाठी टीव्हीचे प्रसारण बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानात २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली असताना ११ आधी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व त्यांची मुलगी मरियम शुक्रवारी ब्रिटनहून दुबईमार्गे लाहोरमध्ये दाखल झाले. विमानतळावर पोहोचताच दोघांनाही सुरक्षा दलाने घेराव घातला. लाहोर शहरात सुमारे १० हजार सैनिकांनाही तैनात करण्यात आले होते. त्यानंतर पीएमएल-एनच्या कार्यकर्त्यांनी विमानतळ तसेच शहराची नाकेबंदी केली होती. 


नवाझ यांचे बंधू शाहबाज शरीफही विमानतळावर हजर होते. परिसरातील शहरांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, याच महिन्यात शरीफ व मरियम यांना इस्लामाबादच्या न्यायालयाने पनामा प्रकरणातील भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानुसार शरीफ यांना १० वर्षे, तर मुलीला ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडापोटी त्यांना १८ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. मरियम यांचे पती सफदरला एक वर्षाची शिक्षा झाली आहे. पनामा प्रकरणात लंडनच्या चार फ्लॅट खरेदीचा भंडाफोड झाला होता. 


पत्नीला अल्लाच्या भरवशावर सोडताना.. 
पत्नी कुलसुम यांना घशाचा कर्करोग आहे. लंडनच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पाकिस्तानात परतण्यापूर्वी नवाझ व मरियम कुलसुम यांची भेट घेण्यासाठी आले होते. शरीफ म्हणाले, मी पत्नीला अल्लाच्या भरवशावर सोडून पाकिस्तानला जात आहे. 


नवाझ म्हणाले : पुढील पिढ्यांसाठी देशात येतोय 
शरीफ यांनी पाकिस्तानात परतण्यापूर्वी लंडन येथे व्हिडिआे संदेश जारी केले. त्यात ते म्हणाले की, माझ्या हाती असलेले शक्य ते मी केले आहे. मला ठाऊक आहे. लाहोरला पोहोचताच तुरुंगात रवानगी होईल. पण हे बलिदान पुढील पिढ्यांसाठी देत आहे. देशाचे भवितव्य घडवण्यासाठी माझ्यासोबत वाटचाल करा, असे माझे जनतेला आवाहन आहे. मला फाशीवर लटकवले तरी बेहत्तर. 


हायकोर्ट : समर्थकांची सुटका तत्काळ करा 
लाहोर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला पीएमएल-एनच्या काही समर्थकांची सुटका करण्याचे आदेश दिले. या समर्थकांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. पीएमएल-एनच्या ३७० कार्यकर्त्यांना अटक केली होती. लंडनमधील घराबाहेर काही जणांनी निदर्शने केली होती. नवाझ यांच्या नातवांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी निदर्शकांना मारहाण केली. लंडन पोलिसांनी दोघांना अटक केली. 

 

आई : नवाझ निर्दोष, मीही तुरुंगात जाणार 
नवाझ शरीफ यांची आई बेगम शमीम अख्तर यांचा व्हिडिआे संदेश जारी झाला आहे. माझ्या मुलाला तुरुंगात पाठवल्यास मीही त्याच्यासोबत जाईन. माझा मुलगा निर्दोष आहे. पाकिस्तानचा पुत्र परत येतोय. त्याने देशाला प्रकाशमान केले आहे. त्याच्या माथ्याचे चुंबन घेता येईल, यासाठी तो मायदेशात येत आहे. मरियमने लंडनमधील मुलांसोबतचे छायाचित्र जाहीर केले आहे. 


१८ वर्षांनी : इतिहासाची केली पुनरावृत्ती 
पाकिस्तानात १८ वर्षांपूर्वी मुशर्रफ यांनी देशाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हासारखीच परिस्थिती शुक्रवारी दिसून आली. १९९९ मध्ये तख्तपालटानंतर निर्वासित नवाझ २००० मध्ये मायदेशी परतले होते. तेव्हा त्यांच्या समर्थकांची विमानतळावर गर्दी होती. तेव्हा मुशर्रफ यांनी नवाझ यांना रोखण्यासाठी समर्थकांवर लाठीमार करायला लावला होता. त्यांच्यासोबतच्या लोकांना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...