आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग दाेनदिवसीय चीन दौऱ्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन मंगळवारी चीनमध्ये दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उच्चस्तरीय वाटाघाटी झाल्यानंतर भविष्यातील कृती कार्यक्रमाची चर्चा ते शी जिनपिंग यांच्याशी करणार आहेत. कोरियन द्वीपकल्पाला अण्वस्त्रमुक्त करण्याचा शब्द किम यांनी ट्रम्प यांना दिला होता. मार्च महिन्यात त्यांनी चीनला प्रथम भेट दिली होती. त्यानंतर हा तिसरा चीन दौरा आहे. बीजिंग आणि वॉशिंग्टनदरम्यान सध्या व्यापारयुद्ध टिपेला असताना किम यांचा हा दौरा आयोजित केला आहे. 


यापूर्वीचे किम यांचे चीन दौरे गुप्त ठेवण्यात आले होते. या वेळीही त्यांचे विमान बीजिंगमध्ये उतरल्यावर त्यांच्या भेटीची बातमी अधिकृतरीत्या देण्यात आली. हा त्यांचा दोनदिवसीय दौरा आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी सांगितले की, हा दौरा पूर्वनियोजित आहे. त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आणि फलित योग्य वेळी सांगण्यात येईल. बीजिंगमध्ये दाखल होईपर्यंत गोपनीयता का ठेवण्यात आली? याविषयी काहीही सांगण्याचे त्यांनी टाळले. 


निर्बंध लादणे म्हणजे संबंध संपुष्टात आणणे नव्हे : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने लादलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त इतर एकतर्फी निर्बंधांना चीन जुमानत नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी सांगितले. सिंगापूर भेटीनंतर उ. कोरियावरील निर्बंध शिथिल होतील का? या प्रश्नाचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. सुरक्षा परिषदेच्या निर्णयांशी चीन बाध्य आहे. मात्र, निर्बंध लादल्याने सर्वच संपुष्टात येते असे नाही. सर्व देशांची सहमती व समन्वय साधण्याचे काम चीन करत आहे. कोरियन द्वीपकल्पाला अण्वस्त्रमुक्त करणे आणि राजकीय स्थैर्यासाठी चीन उ. कोरियाशी सतत संवाद साधेल, असे शुआंग यांनी सांगितले. २००६ पासून उत्तर कोरियावर सुरक्षा परिषदेने आर्थिक निर्बंध लादले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...